सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
शासकीय यंत्रणेत वरिष्ठांना न जुमानता एखादा दिवस कामचुकारपणा केला जाऊ शकतो. परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभाग-सोलापूर याला अपवाद आहे. येथे चक्क गेली 5 वर्षे फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील या त्यांच्या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी अजिबात कार्यरत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत रूग्णांना औषध-गोळ्या वाटपांचे काम आरोग्य सेवक मकानदार आणि इतर शिपायांकडून केले जात आहे. याबाबतचे “स्टिंग ऑपरेशन” “सत्ताकारण”ने प्राथमिक आरोग्य केंद्र औराद येथे जाऊन केले. त्यावेळेस हा गैरप्रकार समोर आला. तसेच तेथील वैद्यकीय अधिकारीही बिनदिक्कतपणे आरोग्य सेवक आणि शिपायांकडून औषध-गोळ्यांचे वाटप करून घेत असल्याचे निदर्शनास आले. असे असताना गेली 5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार अदा केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या 5 वर्षात त्या कोठे व कोणाच्या आदेशाने इतरत्र गैरप्रकारे कार्यरत होत्या का ? हे ही तपासणे गरजेचे आहे. तसेच या सर्व गैरप्रकारात सामिल असलेल्या डॉ. निलम घोगरे, डॉ. रोहित पाटील, आरोग्य सेवक मकानदार आणि शिपाई यांना निलंबीत करून बडतर्फ करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी काकडेंची “काकड आरती”
फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील या 2020-21 मध्ये आंतर जिल्हा बदलीने येथील फार्मासिस्ट सय्यद हे सेवानिवृत्त झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र औराद च्या अंतर्गत असलेल्या आरोग्य पथक बुरूड येथे हजर झाल्या होत्या. सय्यद ज्या प्रमाणे पूर्वी 5 दिवस प्रा. आ. केंद्र औराद व 1 दिवस बुरूड येथे कार्यरत असायचे. त्याप्रमाणे गडदे-पाटील यांनी देखील कामकाज करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी 5 वर्षांत एकही दिवस काम केले नाही. संबंधीत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील काम करून घेतले नाही. उलट या 5 वर्षाच्या काळात प्रा. आ. केंद्र औराद येथे जे-जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते आणि सध्या कार्यरत आहेत, त्या सर्वांनी गडदे-पाटील या कार्यरत नसतानाही त्यांचा पगार अदा केला आहे. शासनाच्या नियमानुसार ना हजेरी पत्रक, ना ही सक्तीची असलेली आधार बेस्ड बायोमेट्रीक हजेरी घेतली, आणि शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पगार अदा केले. नियमबाह्य पध्दतीने पगार अदा करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पगारातील किती हिस्सा घेतला ? शिपाई आणि आरोग्य सेवकांकडून औषध-गोळ्यांचे वाटप करून रूग्णांच्या जिवाशी खेळ वैद्यकीय अधिकारी आणि फार्मासिस्ट का करत आहेत ? शिपाई आणि आरोग्य सेवक देखील औषध-गोळ्यांचे ज्ञान नसताना का वाटप करत आहेत ? त्या-त्या वेळचे जिल्हा आरोग्य अधिकारी झोपा काढत होते का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच सध्या “सत्ताकारण”ने प्रकार उघडकीस आणल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्याकडून संबंधीतांवर कारवाई केली जाणार का ?
“सत्ताकारण”कडून स्टिंग ऑपरेशन…
प्राथमिक आरोग्य केंद्र औराद आणि बुरूड येथे फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील या गेली 5 वर्षे गैरहजर असुन त्यांच्या गैरहजेरीत आरोग्य सेवक आणि शिपायांकडून औषध-गोळ्यांचे वाटप वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील करून घेत असल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून कळाली. पूर्वी हेच काम दक्षिणच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलम घोगरे या तेथे पूर्वी वैद्यकीय अधिकारी असताना करून घ्यावयाच्या. तसेच गैरहजर असतानाही गडदे-पाटील यांचा पगार पूर्वीपासुन ते अद्याप पर्यंत हजेरी नसतनाही अदा केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असलेल्या गैरप्रकाराची वस्तुस्थिती पडताळण्यासाठी “सत्ताकारण”चे मुख्य संपादक रणजित वाघमारे यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी वरील सर्व प्रकार सत्य असल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांनी रूग्णांची तपासणी झाल्यानंतर गडदे-पाटील यांची अनुपस्थिती असतानाही आरोग्य सेवक मकानदार यांच्याकडून औषध-गोळ्यांचे वाटप करून घेत असल्याची बाब खरी ठरली. या सर्व गोष्टींचा पुरावा म्हणुन गोपनीय पध्दतीने सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात आले.
निलंबन आणि बडतर्फची कारवाई आवश्यक…
रूग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील, आरोग्य सेवकांकडून, शिपायांकडून औषध-गोळ्यांचे वाटप करून गडदे-पाटील यांना साथ देणारे आणि बेकायदेशीरपणे पगार अदा करणाऱ्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत पाटील, औषध-गोळ्यांचे वाटप करणारे आरोग्य सेवक मकानदार आणि शिपाई या सर्वांवर निलंबन आणि त्यानंतर बडतर्फची कारवाई होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा सह संचालक (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे
मुरली पदशेट्टी, रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करा : शरत शेट्टी
डॉ. भगवान पवार, डॉ. सारणीकर, सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्या…




