सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
टीबीमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शासन आणि उद्योगांनी हातात हात घालून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
ताज प्रेसिडेंट येथे नुकतेच टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य टीबी अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, पाथच्या संचालक डॉ. आशा हेगडे, उपसंचालक डॉ. दीपक बालसुब्रमण्यम यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा आरोग्य विभागाचा अजब कारभार; ब्लॅक लिस्ट मधील पुरवठाधारकांकडूनच आहार सेवा सुरू
यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी अभियान राबवत आहेत. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येईल. त्यासाठी सीएसआर हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सातत्याने विविध आरोग्य अभियान राबविण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक आजाराच्या तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तपासणी आणि उपचारांविषयीची भीती, आजारामुळे स्वतःला आणि कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची चिंता यामुळे ते तपासणी टाळतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे आहे.

यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील विविध घटकांची साथ आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करता येईल. तसेच केंद्र किंवा राज्य शासन एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोगमुक्त भारत अभियानाशी संबंधित ‘निक्षय मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निक्षय मित्र झाले असून, अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. क्षयरुग्णांना औषधांसह आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र योगदान देत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती आणि पीसीओडीसाठी स्वतंत्र दवाखाने सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पीसीओडीमुळे अनेक किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य टीबी अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, पाथच्या संचालक डॉ. आशा हेगडे, उपसंचालक डॉ. दीपक बालसुब्रमण्यम आणि विविध कॉर्पोरेट कंपनीच्या प्रतिनिधींनी टीबीमुक्त भारत अभियानाबाबत सादरीकरण केले.
हे ही वाचा उपसंचालक (राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग-IEC) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. भगवान पवार यांच्याकडे
उपसंचालकांकडून CS डॉ. वर्षा डोईफोडे, DHO डॉ. सतीश कोपुरवाड यांना नोटीस
“आनंद केमिस्युटिक्स”ला ब्लॅक लिस्ट करून ठेका रद्दची कारवाई कधी ?




