सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
2023 मध्ये सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरो, जलजन्यरोग) पुणे-6 या कार्यालयाकडून ज्या 650 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाची भरती झाली. त्यातील 39 जणांची सध्या सेवासमाप्ती केली आहे. साहजिकच हे 39 जण बोगस असल्यानेच त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली, हे मात्र नक्की. त्यामुळे या बोगस भरतीमधील निवड समितीचा शोध घेतला असता, त्या कार्यकाळात सदरच्या बोगस “प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरती”त निवड समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. बबिता कमलापूरकर, सदस्य सचिव आणि इतर सदस्य असल्याचे समोर आले आहे.
650 पैकी सध्या 39 उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पॅरामेडिकल नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही त्यांना त्या वेळी सहसंचालक कार्यालयातील निवड समितीने नियमबाह्य पध्दतीने नियुक्त्या देत बोगस भरती केली आहे. त्यामुळे निवड समितीचा शोध घेतला असता, यामध्ये तत्कालीन सहसंचालक (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) डॉ. राधाकिशन पवार तर त्यांची या पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर या पदी नियुक्त झालेल्या डॉ. बबिता कमलापुरकर हे दोघे निवड समितीच्या अध्यक्षपदी होते. तर सदस्य सचिव तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. एकनाथ भोसले, सदस्य तथा प्रशासकीय अधिकारी एन. एन. नवाळी, सदस्य तथा राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, सदस्य तथा सहाय्यक संचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, सदस्य तथा प्रशासकीय अधिकारी विशाखा कांबळे या सर्वांचा निवड समितीमध्ये समावेश होता. त्यामुळे संबंधीत बोगस भरतीमधील अधिकाऱ्यांचे निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी केली आहे.
या बोगस भरतीमध्ये निवड समितीने पात्र ठरवलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र परावैद्यकीय परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसतानाही त्यांची सेवा तत्काळ समाप्त का केली गेली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण 8 सर्कलमधून 39 उमेदवारांची सेवासमाप्ती का केली ? जर 39 जणांची सेवासमाप्ती केली आहे ? तर निवड समितीमधील अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्य यांच्यावर कारवाई कधी ? 39 बोगस उमदेवारांवर 420 चे गुन्हे दाखल कधी होणार ? याकडे राज्यातील जनतेचे आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची होणार चौकशी
डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे




