सत्ताकारण न्युज नेटवर्क : सातारा
सातारा येथील जिल्हा हिवताप कार्यालयातील सुमारे ३०० अधिकारी-कर्मचारी गेल्या काही काळापासून हक्काच्या वेतनापासुन वंचीत आहेत. वेतन प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता व वित्तीय प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून “कार्यालयीन निर्णय प्रक्रियेत अनावश्यक विलंब आणि वरिष्ठांचा असहकार” हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारावरून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र कुंभार यांचा अजब कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सातारा येथे जिल्हा हिवताप अधिकारी पदी कार्यरत डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यांच्या कथित आडमुठ्या व निष्क्रिय भूमिकेमुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० कर्मचारी वेतनापासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी १० मार्च २०२६ रोजी अधिकृत तक्रार दाखल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे दाखल केली आहे. सदर तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे यांनी सातारा जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त पत्रानुसार, डॉ. राजेंद्र कुंभार हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार करण्यात आली असून, या संदर्भातील संपूर्ण पडताळणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २५.०२.२०२५ च्या परिपत्रकानुसार नियमबद्ध कार्यवाही करण्याचेही आदेश पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
हे ही वाचा औषध निर्माण अधिकारी पदी लीना पुजारी यांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजीचे वातावरण असून, अनेकांनी शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कर्मचारी संघटनांनीही या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या विभागात प्रशासकीय गोंधळ वाढत असल्याने हिवताप व किटकजन्य रोग नियंत्रणाच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, तसेच सदरच्या पदी सक्षम अशा अधिकाऱ्याची नेमणुक करावी, अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा “भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे”




