सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
संचालक (आरोग्य सेवा संचालनालय, पुणे) डॉ. विजय कंदेवाड यांनी नागरी सेवा मंडळाची शिफारस नसलेल्या प्रस्तावांवर शिफारशीचा उल्लेख करून 5 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी लेखी तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आदींकडे केली आहे.
उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया ही लागू शासन निर्णय, बदली धोरण आणि विहित प्रशासकीय प्रक्रियेनुसार पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने होणे आवश्यक आहे. बदलीच्या प्रत्येक प्रस्तावावर लागू नियमांनुसार आवश्यक शिफारशी व मंजुरी प्राप्त झाल्या आहेत किंवा नाहीत, याची खात्री करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाच्या बदली धोरणानुसार कोणताही राजकीय दबाव, वशिला किंवा शिफारस स्वीकारू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत, असे असताना 15 ऑगस्ट 2026 रोजी पुणे संचालक डॉ. विजय कांदेवाड यांनी उपसंचालक पुणे मंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांना VC द्वारे सूचना देऊन त्याच दीवशी नागरी सेवा मंडळाकडून विनंती बदल्यांची शिफारस घेऊन सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागवून घेतले. यासंबंधी 17 ऑगष्ट 2026 रोजी शासनाच्या बदली प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता व काही कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीच्या प्रस्तावांना दिले जाणारे प्राधान्य याबाबत शासनाकडे निवेदन सादर केले होते. यावर प्राप्त कागदपत्रांनुसार, आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी गट-क संवर्गातील 5 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर पाचही आदेशांमध्ये नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनुसार बदली आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा बलात्कारी, स्त्रीलंपट अन् भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आरोग्य मंत्र्यांकडून अभय
मात्र, या 5 प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब अशी आहे की, माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ यांच्या कार्यालयाकडून संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या संबंधित बदली प्रस्तावांमध्ये नागरी सेवा मंडळाची शिफारस नमूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत, मूळ प्रस्तावांमध्ये नागरी सेवा मंडळाची शिफारस नसताना अंतिम बदली आदेशांमध्ये नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनुसार आदेश काढल्याचा उल्लेख कोणत्या आधारावर करण्यात आला आहे ? असा गंभीर प्रशासकीय प्रश्न निर्माण होत आहे.
जर संबंधित 5 प्रस्तावांवर नागरी सेवा मंडळाची प्रत्यक्षात शिफारस झाली नसेल, तर त्या शिफारशीचा उल्लेख अंतिम आदेशांमध्ये कसा करण्यात आला ? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, मूळ प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संचालक कार्यालयात कोणती प्रक्रिया राबविण्यात आली ? कोणत्या अधिकाऱ्याने प्रस्ताव तपासले ? शिफारशीची नोंद कोणी केली आणि आदेश निर्गमित करण्यापूर्वी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्यात आला ? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
या प्रकरणात डॉ. विजय कंदेवाड आणि संबंधीत अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांमध्ये दिसून येते. त्यामुळे संबंधीत प्रकरणाची निष्प:क्ष चौकशी करून डॉ. विजय कंदेवाड, संचालक, पुणे यांच्या कालावधीत केलेल्या संपूर्ण विनंती बदल्यांची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी. राज्यातील सर्व मंडळातील विनंती बदल्यांची चौकशी करण्यात येऊन, नागरी सेवा मंडळाची शिफारस नसताना केलेल्या सर्व विनंती बदल्या रद्द कराव्यात. तसेच पुणे मंडळ कार्यालयातील 5 कर्मचाऱ्यांची नागरी सेवा मंडळाची शिफारस नसताना डॉ. विजय कंदेवाड यांनी केलेल्या बदल्या रद्द कराव्यात. उपलब्ध माहिती अधिकारातील उत्तर, मूळ प्रस्ताव, अंतिम बदली आदेश आणि संबंधित कार्यालयीन नोंदी यांच्या आधारे निष्प:क्ष चौकशी करावी आणि दोष सिद्ध झाल्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव आणि आयुक्त यांच्याकडे केली आहे. यावर पुणे संचालक डॉ. विजय कंदेवादड हे काय प्रतिक्रीया देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या 5 बदल्या रद्द करण्याची मागणी…
नागरी सेवा मंडळाची शिफारस नसताना वरिष्ठ लिपीक रियाज नुरमोहम्मद सैय्यद, कनिष्ठ लिपीक राहुल सखाराम सांवत, कनिष्ठ लिपीक राहुल शंकरराव जगताप, औषध निर्माण अधिकारी रिना मंगेश मंडलिक आणि अधिपरिचारिका सायली तुकाराम काशिलकर या 5 जणांच्या बदल्या केल्याची तक्रार शरत शेट्टी यांनी केली असुन या 5 बदल्या रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
PI शंकर पटवारी यांच्या बेकायदेशीर कामाकाजाच्या विरोधात छावा संघटनेचे लाक्षणिक उपोषण




