विशेष प्रतिनिधी : रणजित वाघमारे
प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यासाठी 70 कोटींच्या कामासाठी 3 हजार 190 कोटी रूपयांचा घोटाळा, साडेसहा हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा, दुप्पट दराने औषध खरेदीचे घोटाळे, 35 कोटींच्या 100 शववाहीका खरेदी घोटाळा, भरती-बदली-पदोन्नतीसाठी टक्केवारी आदी विविध कारणांमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यानंतर डॉ. राधाकिशन पवार हे आणखी एक नाव आरोग्य विभागात चर्चेत असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊतांवर देखील ते भारी पडत असल्याची चर्चा आरोग्य विभागात आणि राज्यात रंगली आहे. कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर 70 कोटी रूपये वसुली आणि टक्केवारीचे गंभीर आरोप भर अधिवेशनात केले होते. मात्र या आरोपांना तीन महिने झाले तरी देखील डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर अद्यापही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे सभागृहाचा देखील अवमान केला जात असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात 20 डिसेंबर 2024 रोजी भर सभागृहात डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांच्यावर टक्केवारीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, “सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉ. राधाकिशन पवार आणि मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी आरोग्य विभागातील 7 हजार लोकांना प्रत्येकी लाख रूपये जमा करायला सांगितले. लोकसभापती महोदय मला आरोप करायला आवडत नाही. परंतु नाथाभाऊ यांनी 7 हजार लोकांना प्रत्येकी लाख रूपये जमा करायला सांगितले. यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.” परंतु भर सभागृहात सदरचा 7 हजार लोकांकडून प्रत्येकी लाख याप्रमाणे जवळपास 70 कोटींचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. परंतु अद्यापही डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांच्यावर अद्यापही कारवाई केली गेली नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते दानवे यांच्या प्रश्नाला जराही किंमत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे वादग्रस्त ठरलेल्या तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्री पदापासून दूर ठेवले आहे. मात्र त्याच तानाजी सावंत यांना या सर्व प्रकारात मदत करणाऱ्या डॉ. राधाकिशन पवारांवर कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न आरोग्य विभागात उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
खासदार संजय राऊत यांनी देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 3 डिसेंबर 2023 रोजी भ्रष्टाचारासंबंधी लेखी तक्रार दिली होती, यामध्ये म्हटले होते की, “गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या. पैशांची मागणी करण्यासाठी व पैसे जमा करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली असून सर्व पैसे संबंधीत मंत्रीमहोदयांच्या कात्रज येथील खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जातात.” मात्र सदरच्या लेखी तक्रारीतील “उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्यावर” अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला स्थान न देणाऱ्या फडणवीस सरकार कडून या अधिकाऱ्यावर आतातरी कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप