सोलापूर : प्रतिनिधी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे “जन आरोग्य समिती”चे (Public Health Committee) कामकाज जवळपास ठप्प आहे. त्यामुळे रूग्णांच्या कल्याणासाठी असलेली “जन आरोग्य समिती” वाऱ्यावर असून जिल्ह्यात “जन आरोग्य समिती”च राम भरोसे असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे सदरच्या समितीच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी आहे. शासनाने पूर्वीची रूग्ण कल्याण समिती बरखास्त करून नव्याने जन आरोग्य समिती (Public Health Committee) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आर. के. एस. को-ऑर्डीनेटर श्री. नामदे यांनी सध्याच्या सर्व रूग्ण कल्याण समिती बरखास्त करून नव्याने जन आरोग्य समित्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये येथे करणे गरजेचे आहे. त्यांची नोंद धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करणे, तसेच सदरची समिती स्थापन करून तिच्यामार्फत प्राप्त झालेला निधी रूग्णांच्या कल्याणासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च करणे, त्याचे नियोजन करणे, त्यानंतर सर्व सदस्यांना नेमणूक पत्र देणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधी रूग्णांच्या कल्याणासाठी खर्च करणे, याचा सातत्याने पाठपुरावा करणे, जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांना भेटी देणे आदी सर्व कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी आरकेएस को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांची आहे. मात्र जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता जिल्ह्यात 10 टक्केही जन आरोग्य समितीची (Public Health Committee) नोंद नसल्याचे सांगण्यात आले. तसेच धर्मादाय आयुक्तांकडेही सदरच्या समितींची नोंद नाही. आरकेएस को-ऑर्डीनेटर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालयांना भेटी दिल्या नसल्याची माहिती संबंधीत रूग्णालयातील कार्यालय प्रमुखांनी दिली आहे. परिणामी जन आरोग्य समितीचे कामकाज जवळपास ठप्प आहे. निधी असूनही तो खर्च होत नाही. सदरचा निधी वेळेत खर्च न झाल्यास त्याला जबाबदार कोण ? निधी असूनही तो न वापारल्याने आवश्यक औषधे खरेदी न करता आणि यामुळे रूग्णांचा औषधाअभावी मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे रूग्णांच्या कल्याणासाठी असलेली “जन आरोग्य समिती”च (Public Health Committee) रामभरोसे असून रूग्णांऐवजी या समितीलाच सलाईनची गरज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ मनिषा आव्हाळे यांनी लक्ष दिल्यास सदरच्या समित्या रुग्णांसाठी कार्यरत होऊ शकतात.
सदरच्या प्रकाराबाबत कार्यकारी संचालक संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. तर आरकेएस को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांना विचारले असता त्यांनी “अजून समित्या स्थापन झाल्या नाहीत. याबाबत तीन दिवसांपूर्वी पुण्यात मिटींग झाली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात भरपूर अडचणी आहेत. पहिले खाते बंद करायचे का ? झेडपी सदस्य नाहीत, समितीचे सर्व गाईडलाईन्स येणार आहेत, त्यानंतर पुढील सर्व कामकाज सुरू करण्यात येणार आहेत. परंतु जन आरोग्य समितीचा जीआर आला असून त्यामध्ये काही अडचणी आहेत. त्यामध्ये दुरूस्ती करून कामकाम सुरू करा, अशी माहिती बैठकीत कार्यकारी संचालक संजय देशमुख यांनी दिली आहे, अशी प्रतिक्रिया आरकेएस को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांनी दिली.
हे ही वाचा
Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
Health Minister | आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”