प्रतिनिधी : पुणे
सार्वजनिक आरोग्य विभागातील पुणे उपसंचालक कार्यालयात कार्यरत कार्यालयीन अधिक्षक विकास महादेव भुजबळ यांच्या विनंतीवरून त्यांची बदली जिल्हा रूग्णालय, सातारा येथे झाली आहे. मात्र विनंती बदलीस जवळपास 5 महिने होऊनही ते जिल्हा रूग्णालय, सातारा येथे हजर न होता, ते उपसंचालक कार्यालय-पुणे येथेच अद्यापही कार्यरत आहेत. त्यामुळे पुणे विभागात ‘विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा “विकास” सुरूच’ असल्याचे दिसुन येते. तर दुसरीकडे 5 महिन्यानंतरही पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार हे त्यांना कार्यमुक्त का करत नाहीत ? कारण भुजबळाविना त्यांचाही “विकास” खुंटणार आहे का ? त्यामुळे ते भुजबळांना कार्यमुक्त करत नसल्याची चर्चा पुणे विभागात सुरू आहे.
हे ही वाचा शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या
उपसंचालक कार्यालयाकडून सन 2024 रोजी विविध बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये उपसंचालक, आरोग्य सेवा-पुणे येथे कार्यरत विकास महादेव भुजबळ यांची विनंती बदली जिल्हा रूग्णालय-सातारा येथे करण्यात आली होती. या बदलीस जवळपास 5 महिने झाले, तरीही विकास भुजबळ हे उपसंचालक कार्यालय-पुणे येथेच कार्यरत आहेत. ते जिल्हा रूग्णालय-सातारा येथे विनंती बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर झाले नाहीत. त्यामुळे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार हे भुजबळ यांना कार्यमुक्त का करत नाहीत ? अशी चर्चा पुणे विभागात रंगली आहे. दुसरीकडे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केलेल्या बदल्या, पदोन्नती, प्रतिनियुक्त्या, विविध तक्रारींच्या चौकशा यामध्ये विकास भुजबळांचे नाव आघाडीवर आहे. अनेक संघटनांनी लेखी तक्रारीमध्ये भुजबळ यांच्यावर आरोप केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, विकास भुजबळ हे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या नावे बदल्या, पदोन्नती, प्रतिनियुक्त्या, विविध तक्रारींच्या चौकशा मध्ये वसुली करत आहेत. डॉ. राधाकिशन पवार हे एकीकडे प्रमाणिकपणे कामकाज करत असताना त्यांच्या नावे दुसरीकडे भुजबळ हे परस्पर वसुली करत आहेत, असे लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे याकडे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी देखील भुजबळ यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त का केले नाही ? असा प्रश्न पुणे विभागात उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”
अर्भक मृत्यू प्रकरण, कोविड 19 मधील औषध व इतर साहीत्य खरेदी घोटाळा, रूग्णांना अन्न पुरवठा यामध्ये झालेला घोटाळ्यामधील वादग्रस्त भुजबळ आणि पुन्हा सातारा येथेच विनंती बदली
सन 2019 साली साताऱ्यातील जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहातील पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे ड्रेनेज पाईपलाईन साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी सदरच्या पाईपमध्ये अर्भक मृतावस्थेत अडकल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यावेळी खुद्द शरद पवार आणि त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची गंभीर दखल घेतली. परिणामी त्यावेळचे जिल्हा शल्य चिकीत्सक अमोद गडीकर आणि विकास महादेव भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. विकास भुजबळ यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर कालांतराने विकास भुजबळ हे पुणे उपसंचालक कार्यालयात रूजू झाले. आता परत विकास भुजबळ यांनी सातारा येथील जिल्हा रूग्णालयात विनंती बदली करून घेतली आहे. विनंती बदली होऊन 5 महिने झाले तरी ते बदलीच्या ठिकाणी हजर नाहीत. 2 जुलै 2014 चा शासन निर्णय आहे की, एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याने जेथे यापूर्वी काम केले आहे, तेथे किमान १० वर्षे बदलीने नियुक्ती देण्यात येऊ नये. परंतु शासन निर्णयाची पायमल्ली करून विकास भुजबळ यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियमबाह्य पध्दतीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अर्भक मृत्यु प्रकरणातील वादग्रस्त भुजबळ आणि पुन्हा सातारा येथेच विनंती बदली, याला सातारकरांचा विरोध आहे. या प्रकरणाबाबत विकास महादेव भुजबळ यांची प्रतिक्रीया किंवा त्यांचे मत गरजेचे आहे. त्यासाठी भुजबळ यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
हे ही वाचा औषध महामंडळाकडून जादा दराने औषध खरेदी
अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार