मेहकर : प्रतिनिधी
लाल मातीतला खेळ, महाराष्ट्राचा अभिमान असणारा कुस्ती हा खेळ सध्या इंटरनेटच्या युगात लोप पावत चालला आहे. पण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी अस एक गाव आहे, जिथे आजही कुस्ती हा क्रीडा प्रकार खेळला जातो. नुसता खेळला जात नाही तर त्याची जोपासना सुद्धा करण्यात येते. दरवर्षी शेकडो मल्ल यात (मुली सुद्धा कमी नाही) किसन बळी यांच्या नेतृत्वात क्रांतीसुर्य तालीम संघात तयार होऊन महाराष्ट्रात विविध ठिकाणी नाव गाजवतात.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कार्तिक यात्रा महोत्सव निमित्य श्री.पांडुरंग संस्थान आयोजित क्रांतीसुर्य तालीम संघाच्या सहकार्याने भव्य कुस्त्यांची आमदंगल पार पडली. या दंगलीमध्ये एक लाख रुपये बक्षीसाची जंगी लूट करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मेहकर तहसीलचे तहसीलदार निलेश मडके यांची उपस्थिती लाभली. तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, सरपंच किशोर गाभणे, पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी आदी पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. भव्य कुस्त्यांच्या आमदंगलीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जगदीश राजपूत या मल्लाने पटकवले. हे बक्षीस पी. ई. पाटील नेत्ररोग तज्ञ मेहकर यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक जयसिंग राजपूत या मल्लास प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल कुमार गाभणे यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांक शिवा मोरे जालना यांना डॉ. केशव अवचार अध्यक्ष तुळजाई अर्बन बँक यांच्या वतीने देण्यात आले.
तर चौथा क्रमांक विनोद पहिलवान वाशिम एडवोकेट भगवान भराड यांच्या हस्ते देण्यात आले. पाचवा क्रमांक शुभम गत्ते तळणी या पैलवानास पांडुरंग संस्थानचे विश्वस्त सखारामजी मगर, सहावा क्रमांक युवराज जाधव वाशिम यास पुंडलिक मगर माजी सैनिक, सातवा क्रमांक सिद्धू आंधळे पिंपरी आंधळे यांना जिल्हा तालीम संघाचे सचिव सारंग परदेशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कुस्त्यांच्या आम दंगलीमध्ये महिला पहिलवानांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. महिला पैलवानांच्या कुस्त्या या दंगलीमध्ये प्रामुख्याने आकर्षण ठरल्या. महिला कुस्त्यांचे आयोजन हर्षल मेडिकल एजन्सीचे अमोल मगर यांनी केले होते. महिलांच्या कुस्तीमध्ये सुद्धा एकवीस हजार रुपयांच्या बक्षाची जंगी लूट करण्यात आली. प्रत्येक विजेता पैलवान यास कलाविष्कार फाउंडेशन तर्फे स्वर्गीय साहशी वीर विजू मल्ल सुरुशे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रवींद्र वानखेडे अध्यक्ष कलाविष्कार फाउंडेशन व त्यांचे सहकारी तथा क्रांतीसुर्य तालीम संघाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कुस्ती स्पर्धेसाठी प्रोत्साहनपर आमदार डॉ. रायमूलकर , सरपंच किशोर गाभणे, प्राचार्य बाहेकर, आडे ठेकेदार, ज्ञानेश बळी, लंगोटी यार मित्र मंडळ, संत सावता माळी व शिव सावता मित्र मंडळ यांनी आर्थिक मदत केली. कुस्ती दंगलीमध्ये पंच म्हणून गणेश गाभणे, संजय बोरकर, दत्ता तायडे, विशाल मगर, रवींद्र पुरी, गणेश गिरे यांनी काम पाहिले. तर प्रशासकीय व इतर काम कुंडलिक मगर, हरी पाटील, रवी मगर पाटील, अरुण बळी, विजय मगर (गोवा), बालू वाघमारे, गोलू मत्ते, नितीन भराड, राहुल गवई, पंकज लोणकर, रोहिदास डोंगरे यांनी केले. या कुस्ती दंगलीचे विमोचन टी. एल. मगर यांनी केले. भव्य अशा या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी राम रिंढे, दे. माळी सर्कलचे बीट जामदार आदी पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला. तर आभार प्रदर्शन क्रांतीसुर्य तालीम संघाचे अध्यक्ष किसन बळी यांनी मानले. भव्य कुस्त्यांच्या आमदांगलीला गावकरी व तालुकाभरातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.