सोलापूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत येत असतात. सर्व थोर संतांच्या पादुका आणि त्यांच्या बरोबरच असणारे वारकरी भक्त हे शेकडो किलोमीटर अंतर चालून आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे एकत्र येतात. या सर्व वारकरी भक्तांना पायी चालत असताना व पंढरपूर मध्ये आल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. तर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सोयी–सुविधा बरोबरच लोकांमध्ये आरोग्याची जनजागृती व्हावी, यासाठी मार्गदर्शक पॉम्पलेट, बॅनर आदींची छपाई केली जाते. मात्र गेल्या वर्षींपासून पुणे विभागाच्या उपसंचालकांकडून हायटेक आषाढी वारीच्या नावाखाली छपाई आणि प्रसिध्दीसाठी नाहक हायटेक खर्च केला जात आहे.
आषाढी वारीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध आरोग्य उपक्रम व योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात व सर्वांनी याचा लाभ घ्यावा, म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यासाठी पुणे विभागाचे उपसंचालक आणि पुणे, सातारा व सोलापूर येथील जिल्हा परिषद आरोग्य विभाग योग्य प्रकारे नियोजन करून आरोग्य, शिक्षण व जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते. याकामी सर्व जिल्हा परिषदकडील आरोग्य विभागाला आषाढी वारीसाठी IEC साठी स्वतंत्र निधी येतो. यापूर्वी साधारण 2 ते 3 लाखापर्यंत IEC साठी सन 2022 पर्यंत निधी प्राप्त होत होता. तो खर्चही केला जात होता. मात्र गेल्या वर्षीपासून जिल्हास्तरावरील प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून तोच निधी उपसंचालक स्तरावर वळवीला जात आहे. तेथूनच सर्व खर्च केला जात आहे, अशी माहिती संबंधित एका जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्याने दिली. तसेच संबंधित IEC साठी मागील वर्षी 2023-24 मध्ये साधारणतः 50 ते 60 लाखापर्यंतचा निधी उपसंचालक आरोग्यसेवा, पुणे विभाग, पुणे यांनी खर्च केल्याचे जि. प. सोलापूर येथील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार एवढा मोठा निधी यापूर्वी कधी आला नव्हता. परंतु वारी हायटेक करण्याच्या प्रयत्नात बीडच्या भूमिपुत्राने नाहक निधी खर्ची घातला आहे. ज्यामध्ये आरोग्य जनजागृतीपेक्षा स्वतःचे फोटोशेशन करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःच्या अधिकारात स्वतःच्या मर्जीप्रमाणेच नियम, अटी, शर्ती टाकून मर्जीतीलच एजन्सीला पुरवठा आदेश दिले आहेत. यामध्ये ज्या एजन्सीने यापूर्वी खोटी बिले सादर करून आरोग्य विभागाकडून वेळोवेळी IEC चे अनुदान लाटले आहे, त्याच एजन्सीला वारंवार ऑर्डर दिल्या गेल्या आहेत.
या एजन्सीमार्फत फोटो, चित्ररथ तसेच जाणीवपूर्वक व्हिडिओग्राफी मार्फत शूटिंग करून अनावश्यक बाबींवर लाखो रुपयांची उधळण केली असल्याचे दिसून येत आहे. या फोटो–व्हिडिओ शूटिंगमध्ये त्यांचे मार्गदर्शन, ध्वनी पत्राचे दर्शन मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लाखो रुपयांची उधळण उपसंचालकांकडून केली जात आहे. या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या प्रसिध्दीसाठी व स्वतःची हौस भागवण्यासाठी वाढीव निधी खर्ची करून सर्व उठाठेव केली आहे. यापूर्वीच्या कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांनी अशा प्रकारे अनावश्यक खर्च केल्याचे दिसून येत नाही. मात्र लाखो रुपयांची उधळण या अधिकाऱ्याने जणू स्वतःच्या प्रसिध्दीसाठी केल्याचे दिसून येत आहे ? याकडे आरोग्य मंत्री महोदयांनी आता तरी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आषाढी वारीत स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्या अधिकाऱ्यांना या आषाढी वारीचे नियोजन व प्रसिध्दीपासून लांब ठेवावे, असे वारकरी संप्रदायाला वाटत आहे.
बोगस छपाई आणि बोगस बिलांवर लक्ष
गेल्या वर्षी आषाढी वारीत जनजागृतीच्या नावे संबंधीत एजन्सीने बोगस छपाई आणि बोगस बिले सादर केली आहेत. ज्यामध्ये वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याचे पहायला मिळाले. यंदाही अशाच पध्दतीने कागदोपत्री बोगस छपाई आणि बोगस बिले अदा होणार का ? सदरच्या अधिकाऱ्याला यापासून दूर ठेवले जाणार का ? आणि त्याच-त्या एजन्सीला पुन्हा टेंडर दिले जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
क्रमश: