मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारतर्फे मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ (Lek Ladki Yojana) ही योजना जाहिर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी निघाला. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर तिच्या नावे विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवली जाईल. तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रुपये रोख रक्कम मिळेल.
या योजनेसाठीचा अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या अर्जांची व प्रमाणपत्रांची छाननी अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्यसेविकांकडून केली जाईल.
नागरी व ग्रामीण भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलांच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना द्यावी लागणार आहे. प्रत्येक लाभार्थीची ऑनलाईन नोंदणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्यावर आहे.
Lek Ladki Yojana उद्दिष्टे
- मुलींचा जन्मदर वाढविणे
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे
- कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे
Lek Ladki Yojana अटी व शर्ती
- पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 1 किंवा 2 मुलींसाठी ही योजना लागू राहील. 1 मुलगा आणि 1 मुलगी असलेल्या मुलीला मिळेल लाभ.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी माता-पित्याने अर्ज करताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक.
- दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुली असतील तर त्यांनाही लाभ मिळेल. परंतु त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
- 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही लाभ मिळेल.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे.
Lek Ladki Yojana लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी मुलीचा जन्म दाखला आवश्यक
- वार्षिक उत्पन्न 1 लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थी व पालकांचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट)
- राष्ट्रीयीकृत बॅंकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत असणे बंधनकारक )
- लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे (बोनाफाईड)
- माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
- अंतिम लाभावेळी मुलीचा विवाह झाला नसल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे बंधनकारक (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक)
- हे ही वाचा Kunbi Caste Certificate | मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्यांची तपासणी करावी
- Mukesh Ambani Threat | पैसे न दिल्यास Mukesh Ambani यांना गोळ्या घालू