Girl Suicide On Her Wedding Day : येथील हत्तूरे वस्ती, कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. सालिया मेहबूब शेख (रा. ओम नमः शिवाय नगर, सोलापूर) या उच्चशिक्षित तरुणीने लग्नादिवशीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सालिया शेख हिला रविवारीच हळद लागली होती. सोमवारी तिचे लग्न होणार होते. घरी पाहुणे आले होते. लग्न समारंभामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अशातच सदरची धक्कादायक घटना घडली आहे. सालिया हिने (Girl Suicide) राहत्या घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मयत सालिया शेख हिने 15 डिसेंबर 2023 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला एक अर्ज केला होता की, मला समीर चांद साब शेख, सलमान पीरसाब शेख आणि वशिम शेख (सर्व राहणार कुमठे) यांनी सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत. होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुझे लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही, अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद केले आहे. जोपर्यंत या तिघा इसमांना तात्काळ अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका परिवाराने घेतली आहे. दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन मधील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.