बार्शी : प्रतिनिधी
चोरीच्या सोन्यावरून सुरू असलेली भांडणे सोडवणाऱ्या वैराग (ता. बार्शी ) येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मांडे यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली. हा खून 2 एप्रिल 2022 रोजी वैराग येथे सोलापूर रोडवर असलेल्या एका चप्पलच्या दुकानात झाला होता. यामध्ये चौघांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी आरोपीतर्फे ॲड. राजकुमार नरुटे आणि ॲड. राजकुमार बाबरे यांनी काम पाहिले.
हे ही वाचा अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहिर
मिथुन दादाराव साळवे, अखिल याकुब शेख, जुबेर आयुब शेख ( तिघेही रा. वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड) आणि हरी मोहन केकडे (रा. वैराग, तालुका बार्शी, जि. सोलापूर) अशी या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची हकीकत अशी की, दि. 2 एप्रिल 2022 रोजी मिथुन साळवे, जुबेर शेख आणि अखिल शेख हे चोरीच्या सोन्यावरून हरि मोहन केकडे यास वैरागमध्ये मारहाण करत होते. त्यावेळी वैराग येथील पप्पू उर्फ सचिन महादेव पवार यांनी ही भांडणे सोडवली होती. दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर संतोष सिद्धलिंग गणेचारी (वय 56, रा. वैराग) यांनी पप्पू उर्फ सचिन पवार यास फोन करून विठ्ठल कांबळे यांच्या सोलापूर रोडवरील चप्पल दुकानात बोलावून घेतले असता अखिल शेख, मिथून साळवे आणि जुबेर शेख यांच्यासह पप्पू उर्फ सचिन पवार त्या ठिकाणी आला. त्यावेळी विठ्ठल कांबळे यांच्या दुकानात विठ्ठल कांबळे यांच्यासह सुनील धोकटे, चंद्रकांत कावरे व संतोष गणेचारी यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पप्पू आणि अन्य तिघांमधील वाद वाढत गेला. त्यावेळी पप्पू उर्फ सचिन पवार यांनी कोणत्यातरी पोलिसाला फोन करून चोरीच्या सोन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी अखिल आयुब शेख याने चप्पलच्या दुकानात असलेला लाकडी ठोकळा उचलून सचिन पवार यांच्या डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. मिथुन दादाराव साळवे याने चप्पलच्या दुकानातील रापीने वार केला तर जुबेर आयुब शेख याने लाथाबुक्क्याने मारून करून सचिन पवार यास खाली पाडले. सचिन पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याचीच मोटरसायकल घेऊन तिन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते.
हे ही वाचा पुणे जलसंपदा विभागाच्या दक्षता पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याचे आश्वासन
दरम्यान जखमी अवस्थेतील सचिन पवार यास त्याचा भाऊ सुरेश पवार आणि आई यांनी तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 एप्रिल 2022 रोजी पप्पू उर्फ सचिन पवार यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी मयत सचिनचा भाऊ सुरेश महादेव पवार यांनी हरी केकडे यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी सचिन पवार याचा खून केला अशी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून चारही आरोपींवर वैराग पोलीस स्टेशन येथे खून आणि मोटार सायकल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चारही आरोपींना अटक करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
हे ही वाचा आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू
या खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान फिर्यादी सुरेश पवार यांच्यासह चार नेत्र साक्षीदार आणि तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. फिर्यादी सुरेश पवार आणि नेत्र साक्षीदार यांच्या साक्षीमध्ये असलेली तफावत आणि आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपी केकडे यांच्यावतीने ॲड. राजकुमार नरुटे, ॲड. राजकुमार बाबरे, ॲड. एम. ए. लांडगे आणि आरोपी साळवे, आखिल शेख आणि जुबेर शेख यांच्या वतीने ॲड प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे आणि ॲड. आकाश तावडे तर सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.
हे ही वाचा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अपात्र मक्तेदारांना पात्र करून दिले ड्रेनेज लाईन कामांचे टेंडर