अर्थसंकल्पातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी, अर्थसंकल्पातील तरतुदी करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात यासह अर्थसंकल्पाविषयीची संपूर्ण माहिती “अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही” या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन हिराचंद नेमचंद वाचनालयातील ॲम्फी थिएटर येथे रविवारी, 25 मे 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी विद्यापीठातील माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. वसंत जुगळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे असतील. अध्यक्षस्थानी सोलापूर विभागाचे माजी अतिरिक्त आयकर आयुक्त प्रकाश कोळी असतील. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य एम. डी. कमळे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी प्रकाशक प्रा. मंदार फडके विचार व्यक्त करतील. सदरील पुस्तक हे विद्यापीठस्तरीय आणि महाविद्यालयीन शिक्षक-विद्यार्थ्यांबरोबरच अर्थसंकल्प समजून घेणारे सामान्य नागरीक, अभ्यासक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त असल्याची माहिती लेखक प्रा. डॉ. संतोष कदम यांनी दिली. तसेच या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस निखील तळेकर, प्रा. दत्तात्रय चव्हाण, प्रविण भोसले आदी उपस्थित होते.