प्रतिनिधी : पुणे
दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचाराअभावी गर्भवती भगिनी तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदींनी घेतली. परिणामी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांची नेमणुक केली. परंतु दिनानाथ मंगेशकर रूग्णालय वादग्रस्त ठरल्याने चौकशी समिती नेमली. परंतु दुसरीकडे या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमणुक केलेले डॉ. राधाकिशन पवार हेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर मनसेचे पदाधिकारी राम बोरकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्री “ॲक्शन मोड”वर; अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने कारवाईचे दिले आदेश
राम बोरकर यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, राधाकिशन पवार या दोषी व्यक्तीने, दोषी असलेल्या धर्मादाय दिनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाची चौकशी करू नये. राधाकिशन पवार यांच्यावर अनेक वेळा त्यांच्या शासकीय कामात कोट्यावधी रूपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याबाबत त्यांच्यावर विधानसभेत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत विधानसभेतही लक्षवेधी घेऊन फक्त चर्चा झालेली आहे. राधाकिशन पवार हे दोषी असूनही त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई अपेक्षीत असताना, अशी दोषी व्यक्ती, दोषी रूग्णालयाची काय चौकशी करणार ? या चौकशीतून सत्य बाहेर पडेल यात शंका वाटते. अशा प्रकरणाची चौकशी म्हणजे गुन्हेगाराची चौकशी गुन्हेगाराने करायची असे होते. हे आम्ही सहन करणार नाही. धर्मादाय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे एक आकाच आणि त्यांची चौकशी एक प्रशासकीय आका म्हणजे राधाकिशन पवार हे कसे करू शकणार ? असा प्रश्न राम बोरकर यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी तक्रार केली आहे. यावर डॉ. राधाकिशन पवार यांना प्रतिक्रीया विचारली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
हे ही वाचा मॅग्मोचे तत्कालीन अध्यक्ष आणि बिडच्या भुमीपुत्राविरोधात वैद्यकीय अधिकारी आक्रमक