नवी दिल्ली : प्रतिनिधी
रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतून बाहेर गेले आहेत. बीसीसीआयने दोघांना दुखापतीमुळे संघातून बाहेर केल्याचे स्पष्टीकरण दिले असून त्यांच्या ऐवजी बदली खेळाडूंचीही घोषणा केली आहे. सर्फराज खान याला भारतीय कसोटी संघात प्रथमच सामील करण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळाल्याने सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तान मधूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम उल हक याने त्याच्यासाठी एक ट्विट केले आहे जे सोशल मीडियावर वायरल झाले आहे.
पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज इमाम उल हकने सर्फराजला कसोटी पदार्पणासाठी शुभेच्छा देताना एक्स वर लिहिले की भाऊ खूप खूप शुभेच्छा मी तुझ्यासाठी खूपच आनंदी आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय खेळाडूला दिलेल्या शुभेच्छा काही चाहत्यांना मात्र आवडलेल्या नाहीत. एका चाहत्याने ताबडतोब हकला ट्विट करत जहरी टीका केली आहे.
दरम्यान मागील आयपीएल हंगामामध्ये विशेष कामगिरी करू न शकणाऱ्या सर्फराज खानसाठी 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली तर त्याला त्या संधीचे सोन्यात रूपांतर करावे लागणार आहे. सर्फराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बक्कळ धावा काढल्या आहेत. त्याला संधी न मिळाल्याने बीसीसी आयवर सातत्याने टीका झाली आहे. त्यामुळे सर्फराजच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.