पुणे : प्रतिनिधी
औषध खरेदी, बदल्या-प्रतिनियुक्त्या, भरतीमध्ये टक्केवारीचे आणि विविध आरोप झाल्याने आरोग्य सेवा, पुणे मंडळ, उपसंचालक पदावरील डॉ. राधाकिशन पवार यांची आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) येथे उपसंचालक पदी प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे. तसा लेखी आदेश अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी 6 जून 2025 रोजी जारी केला. सदरची बदली ही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार झालेली आहे. त्यामुळे सदरचा आदेश तत्काळ अंमलात आणुन त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. मात्र असे असताना आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्याकडून डॉ. राधाकिशन पवार यांची ज्या पदावरून हकालपट्टी केली आहे. त्याच पदाचा अतिरीक्त पदभार पुन्हा डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडेच देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्याकडून आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच ठिकाणी इतर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती आयुक्तांकडून का केली जात नाही ? आरोग्य विभागात सक्षम अधिकाऱ्याची कमी नसताना सोयीस्कर निर्णय का घेतला जात आहे ? असे प्रश्न सर्वत्र चर्चिले जात आहेत.
आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्या मान्यतेने या आदेशाची अंमलबजावणी सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी केली आहे. त्यांनी 9 जुन 2025 रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांची ज्या पदावरून हकालपट्टी झाली आहे, पुन्हा त्याच पदाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा आदेश आयुक्त नाइक यांना मान्य नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागातून उपस्थित केला जात आहे.
सहसंचालक डॉ. कंदेवाड यांनी काढलेल्या लेखी आदेशात डॉ. राधाकिशन पवार यांच्याबरोबरच डॉ. गोविंद चौधरी, डॉ. विजय बाविस्कर आणि डॉ. बबिता कमलापुरकर यांच्याही प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत. मात्र सहसंचाल डॉ. विजय कंदेवाड यांनी आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्या मान्यतेने संबंधीत इतर अधिकाऱ्यांकडील पदभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. यामध्ये डॉ. गोविंद चौधरी यांच्याकडील सह संचालक (रा.आ.अ) मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. संजीवकुमार जाधव, डॉ. विजय बाविस्कर यांच्याकडील अतिरीक्त संचालक, आरोग्य सेवा (आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम) मुंबई या पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. सुनिता गोल्हाईत यांच्याकडे आणि डॉ. बबिता कमलापुरकर यांच्याकडील सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. संदीप सांगळे यांच्याकडे दिला आहे. मात्र डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडील उपसंचालक, पुणे मंडळ, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुन्हा डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडेच दिला आहे. यामध्ये एकाच वेळी इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर, त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे दिला जातो. मात्र डॉ. राधाकिशन पवार यांच्याबाबत वेगळी भुमिका का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्यावर काय कारवाई करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा “विकास” सुरूच
शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या