प्रतिनिधी : बुलडाणा
बुलडाणा तालुक्यातील रूईखेड टेकाळे येथील शेतकरी दामोधर किसन टेकाळे या शेतकऱ्याची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. सदरची घटना 24 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्री घडली. तर सोयाबिनची सुडी पेटवून दिल्याने या शेतकऱ्याचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दामोधर किसन टेकाळे यांचे रुइखेड टेकाळे शिवारामधील गट नं. 257 मध्ये 1 एक्कर शेती आहे. सदर शेतामध्ये त्यांनी सोयाबीन पेरले होते. सदर सोयाबीन सोंगणी करुन त्याची शेतामध्ये सुडी घातली होती. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास ते घरी असताना त्यांचा चुलत भाऊ भगवान बबन टेकाळे यांचा फोन आला व त्यांनी कळविले की, शेतात पाणी देण्यासाठी गेलो असता शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागुन सुडी पुर्णपणे जळालेली आहे. त्यानंतर दामोधर टेकाळे हे शेतात गेले असता त्यांना शेतातील सोयाबीनची सुडी जळून खाक झालेली दिसली. यात शेतकऱ्याचे सुमारे आठ ते दहा पोत्यांचे अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दामोधर टेकाळे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता बुलडाणा ग्रामीण पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सूड्या पेटवण्याचे सत्र सुरूच
-बुलढाणा जिल्ह्यात सूडया पेटविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत. एकीकडे शेतकऱ्याला ओला आणि कोरडा दुष्काळ व आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे अशा संकटातून मोठ्या कष्टाने मिळवलेले पीक काही समाज कंटकाकडून नष्ट केले जात आहे. त्यामुळे अशा सूड्या पेटवणाऱ्यांच्या या कृत्यामुळे शेतकऱ्यासमोर नविन संकट उभे राहिलेले आहे.