सत्येन्द्र भुसारी
12th Fail : 12वी फेल हा चित्रपट युवा वर्गातील साऱ्यांनीच अवश्य पहावा आणि किशोर वयातील मुला-मुलींना सुद्धा पालकांनी अवश्य दाखवावा व स्वतःही पहावा! हा जरासा वेगळाच संदेश आज मी देवू इच्छितो, तुम्ही म्हणाल अभ्यास करायचं, चांगले क्लासेस लावायचे हे सोडून हा माणूस भलतंच काय सिनेमा पहायला सांगतो! पण मित्रहो तुम्ही जेंव्हा पुर्ण वाचाल तेंव्हा माझ्या मताशी सहमत नक्कीच व्हाल, हा विश्वास मला वाटतो. काल सकाळी थंडी जरा जास्त असल्याने आणि रात्रीच्या पावसाने मैदानावर चिखल असेल म्हणून मी जागी असूनही फिरायला जायचे टाळून सकाळी सकाळी दुर्गा भागवतांची ‘पैस’ वाचत बसलो पण उद्योजक मित्र एकनाथरावचा फोन आला आणि मी मैदानावर पोहचलो. लवकर जाग येऊनही सर्वात आधी येणारे तुम्ही आज उशीर का केला या मित्रांच्या प्रश्नावर मी वाचत बसलो होतो असं सांगितलं तो धागा पकडून मित्रवर्य संदिपसेठ श्रीवास्तव म्हणाले तुम्हाला वाचण्याचा चांगला छन्द आहे, तर डॉक्टर तुम्ही “बारावी फेल ” सिनेमा जरूर पहा एकदा मी हसत हसत त्यांना पृच्छा केली असं काय आहे त्या सिनेमात? त्यांनी म्हटले मलाही पाहायचाय आपण सोबत जावू, लगेच कैलास ठेंग आणि पीएसआय उर्फ प्रमोद इंगळेनी दुजोरा दिला आणि आजच जायचं एरवीही पावसाळी वातावरण आहे आपण सारे बुलढाणा जावून पाहू असं आमचं ठरलं. पण तेवढ्यात मी गिरीश अग्रवालसी बोललो की आपल्या सिनेमॅजिक थिएटर मध्ये हा सिनेमा लागला नाही का? तर त्यांनी तशी चौकशी केली आणि सायंकाळी 6च्या स्पेशलशो ची वेळ निश्चित केली पण किमान 15 तिकिटाची मॅनेजरची अट सांगितली, आम्ही ती पुर्ण केली आणि मग बऱ्याच दिवसानंतर आम्ही सिनेमा पहायला गेलो. तसं तर आजकाल सिनेमाचा योग काही येत नाही. चांगले चित्रपट येत नाहीत, आलेच तर आपल्याला वेळ नसतो आणि चित्रपट चांगला असला वेळही असला तर सोबत रसिक समविचारी समवयस्क सापडत नाही आणि मग ते तसेच राहून जाते. शिवाय हे वय काही चित्रपट गृहात जावून चित्रपट पाहायचं वय नाही असा उगाच पोक्तपणाचा शिरस्ता पडलेला तो ही आडवा येतो, असो. पण ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग तो योग ती संधी खरं म्हणजे सुवर्णसंधी ठरली. बऱ्याच दिवसानंतर एक चांगला चित्रपट पाहता आला! ज्यात रिकामी ढिशम ढिशुम नव्हती, चौथ्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याची आणि पुन्हा जोरदार मारामारीची दृश्यही दिसली नाहीत. नाही म्हणायला एकदा बंदुकीचा आवाज आला तेही चंबळच्या खोऱ्यातील गाव होते ते जाणवावे म्हणून आणि मग तिथल्याच पोलीस ठाण्यातला थोडाफार बाजीरावचा आवाज दोन तीन मिनिट दिसला तेवढाच! अरे हो दोनदा चप्पल थोबाडावर थाडकन बसलेली दिसली! बाकी काहीच फायटिंग नाही कुस्ती नाही. साऊथचे सिनेमे पाहल्यावर मग हा अगदीच मिळमिळीत ठरतो बरं! शिवाय ते इलू इलू चे गाणे नाही अन तु माझं पिल्लु असं ओढून ताणून आणलेलं पालूपद तर अजिबात नाही,आणि तोकड्या कपड्यातील अंगप्रदर्शन करणारे डान्स पण दिसलेच नाहीत हो… मला एक समजत नाही ती नाचणारी नटी नेमकी ते नायकाला दाखवत असते की दुसऱ्याच कुणाला? जावू द्या असो तो आपला विषय नाही. एकदा आय लव यू म्हण सगळी दुनिया इकडची तिकडे करील हा भाबडा वाटणाऱ्या प्रेमाच्या सागरात आकंठ डुबलेल्या प्रेमाविराचा एक संवाद तेवढा नावाला आहे. अगदी खऱ्या प्रेमाचा उच्च दर्जाचा अविष्कार या चित्रपटात आहे दोन समवयस्क तरुण जिव मनापासून जवळ येतात तेंव्हा त्यात प्रेम होणं गैर तरी कसं म्हणावं आणि प्रेमातला प्रणय ही मग कसा नाकारता येईल? तो या ही ठिकाणी आहे पण “पहले पढाई फिर प्यार होगा ” हे कृतीतून दाखवून देणारा फक्त तसे गाणे गावून नाचणारा नाही. तर असा हा नो फायटिंग नो डान्स वाला सिनेमा आहे म्हणून पाहला पाहिजे, कारण कथानक जबरदस्त आहे, वस्तुस्थिती वर रचलेलं आणि प्रत्यक्ष घडलेलं आहे, अगदी सध्या भारतीय सर्वोच्च सेवेत कार्यरत असलेल्या आय पी एस व आय आर एस झालेल्या जोडीच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. आजचा आय पी एस बारावी फेल झाला तरी जिद्दीने चिकाटीने मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी घेऊन खेड्यातून ग्वाल्हेर आणि दिल्लीला पोहचला, अंत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत संघर्षातून शिकला.
“हारा वही जो लडा नही” जिंकायचं असेल तर लढावंच लागेल, जे लढू शकत नाहीत ते हरतात! या सकारात्मक स्लोगन वर हा नायक एकाकी लढाई लढतो, त्याला UPSC ची शेवटच्या अटेंप्ट पर्यंत तयारी करून शेवटी मुलाखतीत अडकलेला एक सिनियर भेटतो, व सारख्याच समस्यांचा सामना करत असल्यामुळे तो ताकदीने वेळोवेळी मदतीला येतो,श्रीमंत ठेकेदाराचा पोरगा बापाच्या इच्छेपायी स्वतःची विडिओ ग्राफर होण्याची ईच्छा दाबून स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ह्या नायकाला चांगला मित्र म्हणून मदत करतो. तरीही हा स्वाभिमानी नायक दिवसभर वेगवेगळी कामं करतो रात्री अभ्यास करतो तीन वेळा मेन्स पर्यंत पोहचतो अन पुन्हा सापसिडीसारखा खाली घरंगळत येतो आणि री स्टार्ट चा जप करून पुन्हा जोमाने अभ्यासाला लागतो. चंबळच्या दुर्गम खोऱ्यातून येवून देशाच्या राजधानीत दिल्लीतील हाय फाय सोसायटीत आणि चकचकित वातावरणात गोंधळून जातो. पण कसीही परिस्थिती येवो कितीही समस्या येवोत घाबरायचं नाही जे होईल ते होवो डगमगायचं नाही, आपण आपल्या लक्ष्यावर आपल्या ध्येयावर ध्यान केंद्रीत करायचं, यश मिळेलच हा दुर्दम्य आशावाद त्या नायकाकडे म्हणजे मनोज शर्माजवळ होता. उद्याची खाण्याची सोय नसेल कदाचित त्याची चिंता नही पण परवा मी आय पी एस होणारच हा प्रचंड आत्मविश्वास होता आणि तितकीच प्रचंड सकारात्मकता होती. हे करत असतांना आर्थिक ओढाताणीला सामोरं जाण्याची हिम्मत होती, त्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी होती, कोणतंच काम हलकं किंवा भारी नसतं ही खूणगाठ मनोज शर्मानी मनासी पक्की बांधलेली होती. आणि कठीण काळात एकमेकांना सावरून घ्यायला ती सुसंस्कारीत नायिका श्रद्धा जोशी सोबतीला होती, नावाप्रमाणेच अभ्यासावर आणि परिश्रमावर तिची श्रद्धा होती.
यशाला शॉर्ट कट नसतो!, कठीण परिश्रमाशिवाय चांगले व टिकावू यश मिळत नसते! हा संदेश स्वतःच्या जगण्यातून देणारा आणि भ्रष्टाचारापासून स्वतःला दूर ठेवणारा नायक व नायिका दर्जेदार अभिनयाने चित्रपटाचा मुख्य उद्देश दर्शकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होतात. तर आजकाल इंग्लिश चा जो बाऊ केला जातो त्यावरही प्रकाश टाकलाय ‘भाषा हि काही समस्या नसते तर ते फक्त माध्यम असते, आणि मातृभाषा हि स्वतःला सिद्ध करण्याची खरी संधी देत असते, किंबहुना यशस्वी होण्यासाठी आपल्या योग्य भावना आपल्या मातृभाषेतून व्यक्त करणे खरे फायदेशीर ठरते. असाही संदेश या चित्रपटातून सहज मिळाल्याशिवाय राहत नाही.
आयुष्यभर इमानदारीने जगत आलेला गरीब पण स्वाभिमानी तत्ववादी बाप जेंव्हा व्यवस्थेपुढे हतबल होतो आणि विमनस्क अवस्थेत मुलापुढे नाईलाजाने ओक्सबोक्सी रडत इमानदारीने जगणे शक्य नाही दुसरे मार्ग शोधू हे सांगतो तेंव्हा हा तरुण नायक बापाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शालेय पुस्तकातील बापानीच शिकवलेल्या कवितेतील ओळींची आठवण करून देतो —-
*हार नही मानूंगा*
*रार नही ठानूंगा*
*काल के कपाल पर*
*लिखता जाता हूं*
*गीत नया गाता हूं…*
आणि मग ह्या अत्यंत प्रेरणात्मक कवितेच्या अगदी कथानाकला साजेशा ओळी दर्शकांच्याही मनातल्या मनात गुणगुणल्याशिवाय राहत नाहीत .
म्हणूनच अशा या अनेक गोष्टींनी सकारात्मकता वाढविणारा आणि प्रेरणादायी असा हा चित्रपट अवश्य पाहिलाच पाहिजेत.
जाता जाता एक राहूनच गेलं ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विधू विनोद चोप्रा, कथानक आहे अनुराग पाठक यांचं तर नवखे नायक नायिका आहेत विक्रांत मेसी,मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमन पुष्कर आणि सहकलाकार या साऱ्यांच्या अभिनयाने चित्रपटाची रंगत आणखी वाढत जाते आणि प्रेक्षकांना पुर्ण वेळ खिळवून ठेवते…..
12th Fail