सोलापूर : प्रतिनिधी
Sugarcane : साखर कारखानदारांनी दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. परंतु त्यांना ऊसाची चणचण भासत आहे. परिणामी चीट बॉय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शोधत असल्याचे दिसून आले. मात्र दुसरीकडे दक्षिण सोलापुरात कर्नाटकातील साखर कारखान्यांनी धडक मारली असून जागेवरच भाव ठरवून ऊसाची पळवा-पळव सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊस पळवला जातोय कर्नाटकात असे दृश्य आहे.
यंदाच्या हंगामात पाऊस कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सीना-भीमा खोऱ्यात असलेली ऊसशेतीही यंदा संकटात आहे. पाऊस कमी पडल्याने ऊसाची वाढ व्यवस्थित झालेली दिसत नाही. अशात बऱ्याच जणांनी चाऱ्यासाठी ऊसाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वाढलेल्या साखर कारखान्यांना यंदा मुबलक ऊस मिळणे अवघड झाले आहे. अशात दक्षिण सोलापुरात कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रवेश केला आहे. हार्वेस्ट मशीनद्वारे या कारखान्याच्या टोळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात फिरताना दिसत आहेत. साखर कारखान्याच्या चिटबॉयला खूप महत्त्व असते. ऊस भरपूर असताना आपला ऊस लवकर जावा म्हणून शेतकरी चीटबॉयच्या मागे लागताना दिसून येत होते. परंतु सध्या परिस्थिती उलट दिसत आहे. चिटबॉय नोंदी असलेले शेतकरी ऊस देतात का? हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत.
हे ही वाचा भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या
FRP वरून दरवर्षी गोंधळ होतो. त्यामुळे यंदा बऱ्याच साखर कारखान्यांनी आधीच आपला भाव जाहीर करून हंगामाला सुरुवात केली आहे. अशात कर्नाटकातील कारखानदारांनी घुसखोरी करून जागेवरच तीन ते साडेतीन हजार भाव देण्याचे ठरवून ऊसाची पळवा-पळवी सुरू केली आहे. यामुळे यापेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांची अडचण होणार आहे. पावसाअभावी ऊस वाळत चालल्याने ऊस लवकर जावा, ही शेतकऱ्यांची भूमिका असल्याने जो जादा दर देईल व पैसे न मागता ऊस तोडून नेईल, त्याला ऊस दिला जात आहे. मात्र यंदा ऊस तोडीसाठी पैसे मोजण्याची शेतकऱ्यांवर वेळ येणार नाही, असे चित्र दिसत आहे. महिनाभरात ऊस शेती संपुष्टात येईल व कारखान्यांची मोठीच अडचण होईल, अशी यंदाची परिस्थिती दिसत आहे.
हे ही वाचा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या टीम इंडियाला किती?
पावसाअभावी जिल्ह्यातील विहिरी, बोअर आटण्याच्या मार्गावर असल्याने ऊसाची शेती काढून टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदापेक्षा पुढील वर्षीचा गळीत हंगाम साखर कारखान्यांना खूपच अडचणीचा ठरणार असे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा बाबा रामदेव यांचे सुंदर त्वचेसाठी रामबाण उपाय, ४० व्या वर्षीही दिसाल सुंदर
World Cup पराभवानंतर अमिताभ बच्चन यांची क्रिप्टिक पोस्ट; चाहत्यांची निराशा