सोलापूर : प्रतिनिधी
जि. प. आरोग्य विभागातील औषध भांडार येथे औषध भांडार प्रमुख पदावर प्रविण सोलंकी गैरप्रकारे कार्यरत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाला डावलून वादग्रस्त असलेल्या सोलंकी यांची गैरप्रकारे नेमणूक केली आहे. सोलंकी हे गेल्या 10 वर्षात वारंवार औषध भांडारात कार्यरत असताना त्यांच्यावर अनेक घोटाळ्यांमध्ये चौकशा सुरू आहे. गैरप्रकारे एक्सपायरी जवळ आलेल्या मेडिसीनची खरेदी केली आहे. आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या सप्लायरला स्वतःहून ते कॉल करतात. त्यामुळे सोलंकी विरोधात भिमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे “प्रविण सोलंकी हटाव, औषध भांडार बचाव” म्हणत आज उपोषण करण्यात आले.
हे ही वाचा औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकींना औषध भांडार प्रमुख पदावरून हटवा
भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आज (सोमवार, दि. 4 मार्च 2024) रोजी सकाळी साडेदहा वाजता सोलंकी यांच्या गैरकारभारा विरोधात उपोषण करण्यात आले. यावेळी सुनंदा बडूरे, मिनाबाई परदेशी, जायदा सय्यद, प्रमिला तुपलोंढे, रेणूका परदेशी, अनिता बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी म्हणाल्या, सोलंकी हे ठराविक औषध सप्लायरसाठी काम करतात. गेल्या 10 वर्षातील औषधांच्या ऑर्डर पाहिल्यास त्याच त्या कंपन्या आणि तेच ते सप्लायर दिसतील. जिल्ह्यात, राज्यात आणि इतर राज्यातील ठराविक कंपन्या आणि टेंडरधारकांचा सोलंकी यांनी मक्ता घेतला आहे. इतर टेंडरधारक पात्र असतानाही सोलंकी त्यांना टेंडर काढून घेण्यास सांगतात. मर्जीतील टेंडरधारकांना बरोबर नियम अटीत बसवतात. अनेकवेळा मर्जीतल्या टेंडरधारकांसाठीच सोयीस्कर निमय-अटी बनवल्या जातात. ज्यातून इतर टेंडरधारक अपात्र होतील. त्यामुळे अशा अनेक गैरप्रकारे औषध भांडारात कार्यरत असणाऱ्या सोलंकी यांना हटवण्यासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेने उपोषण केले आहे.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये
पुढे बोलताना भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्ष परदेशी म्हणाल्या, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे सोलंकी यांना पाठिशी घालत आहेत. त्यांना विविध घोटाळयातील, चौकशीतील कर्मचाऱ्याची साथ कशाला हवी आहे ? ज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या आदेशालाही डॉ. नवलेंनी बगल दिली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत का ? त्यांना तक्रारी निवेदन देऊनही अद्याप सोलंकी यांना हटवले नाही. 50 हून अधिक फार्मासिस्ट असताना त्यांना सोलंकीच का हवा आहे ? 50 मधील एकाही फार्मासिस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप नसताना त्यातील फार्मासिस्टची नेमणूक न करण्यापाठीमागे काय गौडबंगाल आहे ? मार्च मधील मलई साठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे सोलंकी यांना पोसत आहेत का ? असे प्रश्न भिमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे उपस्थित केले आहेत. तसेच सोलंकी विरोधात तक्रारी अर्ज देऊनही कारवाई केली नसल्याने आजचे उपोषण करण्यात आले आहे. यानंतरही येत्या दोन दिवसांत सोलंकीला न हटवल्यास अशाच पध्दतीचे बेमुदत उपोषण मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर करण्यात येईल. याला सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हेच जबाबदार असतील.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये
ग्रामीण व नागरी भागातील 91 टक्के बालकांचे पोलिओ लसीकरण
फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजेंवर गुन्हा दाखल