सोलापूर : प्रतिनिधी
Recruitment : शिक्षक भरती संदर्भात शिक्षण आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशा सूचना राज्यातील सर्व झेडपीच्या सीईओ यांना दिल्या आहेत. मात्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात शिक्षक भरती संदर्भात बिंदूनामावलीतील दुरुस्तीबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या संदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच आता पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना 80 टक्के ऐवजी 70 टक्के रिक्त पदांची मागणी करावी, अशी नव्याने सूचना 19 डिसेंबर रोजी शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हा परिषदच्या सीईओ यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापूर्वीच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमध्ये आता पुन्हा 10 टक्के जागा कमी भरल्या जाणार असल्याने या निर्णयाविरोधात राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे 70 ऐजवी 80 टक्के पदभरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती शिक्षक भरती संघटनेचे प्रवक्ता तथा उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केली आहे.
जून 2023 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षकांच्या रिक्त पदांच्या 80 टक्के पद भरण्यास दिलेली परवानगीनुसार सर्व पदे भरवायची आहेत. मात्र बिंदूनामाली संदर्भात काही वैध आक्षेप किंवा तक्रारी प्राप्त असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल आणि शासनाच्या परवानगीनुसार उर्वरित 10 टक्के रिक्त पदे भरतीची कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत बिंदूनामावली तपासण्याची कारवाई सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, संघटना, उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदू नामावली अचूक करण्याबाबत, त्रुटी दूर करण्याबाबत निवेदने मिळाली होती. शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदूनामावली अद्यावत करण्याची कारवाई केली गेलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाची बिंदूनामावली लवकरात लवकर पूर्ण करून संवर्ग व प्रवर्ग यादी जाहीर करण्यात यावी. रिक्त जागेच्या संदर्भात सुद्धा माहिती द्यावी.
शासनाने तत्काळ 80 टक्के पद भरती करावी
