सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व शहरी भागात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी, ३ मार्च २०२४ रोजी राबविली. या मोहिमेत ग्रामीण व नागरी भागातील 91 टक्के बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस पाजण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम पार पडली. यावेळी माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण, पुणे येथील डॉ. ढवळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले. तर तुंगत (ता. पंढरपूर) येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनीही बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला.
हे ही वाचा औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकींना औषध भांडार प्रमुख पदावरून हटवा
जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी भागात 5 वर्षाखालील एकूण 3 लाख 42 हजार 807 बालके आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात एकूण 2 हजार 418 आणि नागरी भागात 210 लसीकरण केंद्रे, 119 मोबाईल टीम, 120 ट्रान्झीट टीम स्थापन करण्यात आल्या होत्या. परिणामी जिल्ह्यात 91 टक्के बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. उर्वरित बालकांना 5 ते 7 मार्च 2024 या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कार्यकर्ता यांचेमार्फत घरोघरी, वाडी-वस्ती, ऊसतोड टोळी, वीटभट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे.
हे ही वाचा सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाला केराची टोपली
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा आयुष अधिकारी विलास सरवदे, जिल्हा माध्यम अधिकारी तथा आरोग्य सेवक रफिक शेख, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्यवर्धिनीचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कर्मचारी तसेच जिल्हा परिषदचे व शासनाचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.
हे ही वाचा फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजेंवर गुन्हा दाखल