रणजित वाघमारे : सत्ताकारण न्युज नेटवर्क
डॉ. प्रा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पूर्वी “कृष्णा”ने लावलेले दिवे एकीकडे विझवत आहेत, असे असताना दुसरीकडे (Pharmaceutical Corporation) औषध महामंडळात त्यांचाच एक “गरजे” महाराष्ट्र माझा म्हणत “दिवे” लावत आहे. एकूणच डॉ. प्रा. आरोग्य मंत्री सावंत यांचे राज्यभरातील आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी त्यांचेच कैक स्विय सहाय्यक डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे हे कैक स्विय सहाय्यक हे विरोधकांचे तर हस्तक नाहीत ना ? असा प्रश्न मंत्रालयात आणि राज्यभरातील आरोग्य यंत्रणेत उपस्थित केला जात आहे. यामुळे डॉ. प्रा. आरोग्य मंत्री सावंत यांनी त्यांना सलाईनवर ठेवणे गरजेचे असल्याची चर्चा राज्यभर आहे.
Pharmaceutical Corporation मध्ये आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सलाईनवर असलेल्या आरोग्य विभागाला सुरळीत केले. निवृत्तीनंतरही ठाण मांडून बसलेले तत्कालीन सतीश पवार आणि अर्चना पाटील यांना घरचा रस्ता दाखवला. जवळपास वीस वर्षे सोलापूर या एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आणि जालना चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांना निलंबीत केले. कुटूंब कल्याण विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंडे यांची बदली केली. प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याठिकाणी मिलिंद म्हैसकर यांना बसवले. संचालक डॉ. स्वप्निल लाळे आणि डॉ. नितीन अंबाडेकर यांची पदावनती करण्यात आली.
मात्र या सर्व घटना घडामोडीचे भांडवल करत “कृष्णा”ने दिवे लावले. निलंबीत जिल्हा आरोग्य अधिकारी पद असो की उपसंचालक पद किंवा प्रधान सचिव, यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या नावे “रेट कार्ड”च छापले. एकाच जागेसाठी अनेकांकडून “पेटी” अन “खोका” घेऊन ठेवले. आरोग्य मंत्र्यांना अंधारात ठेऊन चाललेला कारभार शेवटी उजेडात आला. आरोग्य मंत्र्यांच्या कानावर तक्रारी गेल्या. शेवटी “कृष्णा”ला घरचा रस्ता दाखवला.
Pharmaceutical Corporation मध्ये “गरजे” महाराष्ट्र माझा
सध्याही आरोग्य मंत्र्यांचे प्रामाणिक पणे काम करण्याच्या सर्वांना सूचना असतानाही “गरजे” महाराष्ट्र माझा हा उठाठेवी करत आहे. औषध महामंडळात त्यांनी “100 टक्के” स्वतःला झोकून दिले आहे. सप्लायर तर सोडाच थेट मेडिसीन कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करून “उद्योग” सुरू ठेवले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि त्यांचे स्टोअर किपर यांना थेट मुंबईत आरोग्य मंत्र्यांच्या नावे बैठकीस बोलावून औषध महामंडळाच्या (Pharmaceutical Corporation) नियम, अटी, शर्ती आणि प्रोटोकॉल सांगितला आहे. अत्यावश्यक म्हणून फक्त 10 टक्के स्थानिक पातळीवर खरेदी, बाकी आम्ही माणूस देऊ. सर्व काही त्यांच्याकडूनच… अशा सूचना दिल्या आहेत. हे सांगतानाच यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यायला ते विसरले नाहीत.
तर त्याही पुढे जाऊन महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपर्यंत महामंडळाचे कसे धागेदोरे आहेत, हेही ते सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे हाफकिन सोडून औषध महामंडळ का ? हे आरोग्य विभागात सर्वसृत झाले नाही असे नाही… त्यामुळे यामध्ये त्रासलेल्या अधिकाऱ्यांनी “गरजे” महाराष्ट्र माझाचे ऑडिओ आणि व्हिडीओ “सत्ताकारण”च्या हाती दिले आहेत.
यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वेळीच धोका ओळखून “गरजे” महाराष्ट्र माझा ला आवर न घातल्यास खुद्द आरोग्य मंत्र्यांना याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा मंत्रालय आणि राज्याच्या आरोग्य विभागात सुरू आहे. यावर आरोग्य मंत्री सावंत हे काय भूमिका घेतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pharmaceutical Corporation