सोलापूर : प्रतिनिधी
शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कामती खुर्द, मोहोळ येथे मनिषा फुले यांची प्रशासक नेमणुक झाल्यापासून त्यांनी या आश्रम शाळेस एकदाही भेट देऊन पाहणी केली नाही. परिणामी या आश्रम शाळेत चुकीची प्रशासकीय कामे होत आहेत. तरी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव विनिता वैद सिंगल आणि पुणे विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी येथे समक्ष भेट देऊन या आश्रम शाळेची पाहणी करावी आणि प्रशासक व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला अशोक परदेशी यांनी केली आहे.
हे ही वाचा आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू
लेखी तक्रारीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला परदेशी यांनी म्हटले आहे की, शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील नवीन पदे भरण्याची मान्यता नसताना मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी स्वतःच्या मुलीस “महिला अधीक्षक” पदी चुकीच्या पध्दतीने मान्यता घेऊन नेमणुक केली आहे. यामध्ये या आश्रम शाळेवरील प्रशासक आणि मुख्याध्यापक यांनी संगणमत करून कामावर घेतले आहे. तसेच संस्थेच्या खोट्या सह्या करून व खोटा प्रस्ताव सादर करून तुकडीवाढ मान्यता देखील घेण्यात आली आहे. त्याप्रकरणी मुख्याध्यापक जब्बार शेख व त्यांच्या सहकाऱ्यांवर मोहोळ कोर्टात केस सुरू आहे. शाळेवर प्रशासक असताना व संस्थेचा कोणताही संबंध नसताना मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी स्वतःच्या मुलीसाठी महिला अधिक्षक पदाची मान्यता घेऊन शासनाची व संस्थेची फसवणूक केली आहे. परमेश्वर आश्रम शाळेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक प्रशासकाने प्रमाणित करून देणे बंधनकारक आहे. परंतु प्रशासक या हजेरी पुस्तक प्रमाणित करून देत नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक जब्बार शेख हे अनधिकृत भरती करून आर्थिक व्यवहार करत आहे. तरी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव विनिता वैद सिंगल यांनी याकडे लक्ष देऊन प्रशासकावर व मुख्याध्यापकावर कारवाई करावी.
हे ही वाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”
तसेच पुढे तक्रारीत म्हटले आहे की, यापूर्वी जब्बार शेख हे मुख्याध्यापक पदी होते. परंतु नंतर 3 वर्ष संस्थेने त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने ते सहशिक्षक म्हणून रुजू होणे गरजेचे आहे. सहशिक्षक म्हणून रूजू होण्याची कोर्टाची तशी ऑर्डर आहे. मात्र जब्बार शेख आणि प्रशासक यांनी संगणमत करून मुख्याध्यापक पदावर जब्बार शेख यांना बसवले आहे. दुसरीकडे ते मुलांचे लाखोंचे अनुदान उचलत आहेत. तरी कोर्टाची ऑर्डर तपासून यावर कारवाई करावी. तसेच शेख यांनी शिक्षक, क्लार्क, अधिक्षक, शिपाई आदींची गैरप्रकारे भरती केली आहे. या शाळेत मुले किती आहेत आणि शिक्षक किती याचा ताळमेळ लागत नाही. तसेच मुख्याध्यापक जब्बर शेख म्हणतात की, पूर्ण संचालक मंडळ माझ्या खिशात आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कोणताही अधिकारी कारवाई करणार नाही, तरी यातील दोषी प्रशासक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच प्रशासक मनिषा फुले यापूर्वी शिष्यवृत्ती घोटाळ्यांमध्ये अनेक महिने जेलमध्ये होत्या. फुले या सोलापुरात कार्यरत असताना हा घोटाळा झाला होता. आता परत त्यांना सोलापूरातच नेमणूक दिली आहे. त्यांच्या अनेक तक्रारी असताना येथे नेमणूक कशी दिली ? तसेच फुले यांनी शासनाच्या नियमानुसार शाळांना इमारत भाडे न देता वाढीव भाडे दिले आहे, त्याचेही ऑडिट करून कारवाई करावी, अशी मागणी रत्नमाला परदेशी यांनी केली आहे. तसेच याबाबत कारवाई न झाल्यास मंत्री अतुल सावे यांच्याकडे दाद मागण्यात येईल, असे मत परदेशी यांनी व्यक्त केले. यावर प्रशासक मनिषा फुले आणि मुख्याध्यापक जब्बार शेख हे काय प्रतिक्रीया देणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा आरक्षण धोरणाची पायमल्ली करणाऱ्या डॉ. राधाकिशन पवार यांची चौकशी करून कारवाई करा