सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सोलापूर जिल्ह्यात “राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत” मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधला जात आहे. या माध्यमातून आजतागायत 1 हजार 847 मुलांच्या ह्दयरोग शस्त्रक्रीया व इतर विविध आजारांच्या 9 हजार 797 शस्त्रक्रिया अशा एकूण 11 हजारहून अधिक मुलांवर मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी “सत्ताकारण”ला दिली.
हे ही वाचा डॉ. मनिषा विखे आणि डॉ. मिनाक्षी बनसोडे यांचे निलंबन
सोलापूर जिल्हयात राज्य व केंद्रशासनाच्या सहयोगाने आरोग्य विभागाचा अत्यंत महत्त्वकांक्षी अशा “राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमा”ची सुरवात सन 2013 पासून झाली आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडी व शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधणे हा महत्वाचा भाग आहे. यात प्रामुख्याने जन्मत: व्यंग, पोषणद्रव्यची कमतरता, शारिरिक व मानसिक विकासात्मक बदल, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारावर उपचार व निदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जातात. यात प्रामुख्याने गंभीर आजारावरील उपचार हे पुर्वतपासणी (MRI, CT Scan, EEG, ECG, BERA Test, 2D Echo, Cardiac Cath, Audiometry, Blood investigation, X-ray, Color Doppler Study, CT AngioHeart,USG) व बालकांची शस्त्रक्रिया होईपर्यत निरंतर पाठपुरावा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो.
जिल्हयात अशी होते अंमलबजावणी…
सोलापूर जिल्हयात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत एकूण 52 आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहेत. प्रति पथकात 2 वैद्यकीय अधिकारी (1 पुरुष आणि 1 महिला) 1 औषधनिर्माता व 1 आरोग्य सेविका असे एकूण 4 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आसतात. प्रत्येक आरोग्य तपासणी पथकाकडून अंगणवाडीतील बालकांची दोन वेळा व शाळेतील बालकांची एकदा आरोग्य तपासणी केली जाते. सोलापूर जिल्हयातील एकूण 4 हजार 754 अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा व एकूण 4 हजार 96 शाळेतील मुलांची एकदा आरोग्य तपासणी नेमलेल्या पथकाकडून करण्यात येते. यात अंगणवाडीतील एकुण 3 लाख 1 हजार 591 बालके व शाळेतील 6 लाख 10 हजार 228 विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यंदाच्या वर्षी माहे एप्रिल 2025 पासून 66 मुलांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच 819 मुलांच्या इतर शस्त्रक्रिया राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक विविध आजाराने ग्रस्त बालकांना, मुलांना संदर्भसेवा देण्याचे कामकाज प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुगणालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालये आणि विविध खाजगी करार बाधीत रुग्णालये, विविध स्वंसेवी संस्था यांच्यामार्फत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत पथकाकडून केले जाते. संदर्भित मुलांना जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान केंद्राच्या ठिकाणी संदर्भसेवा देण्यासाठी पाठवण्यात येते. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप नियंत्रण कक्ष हा सोलापूर जिल्ह्यात महिला रुग्णालय येथे स्थापित आहे. याठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून त्यांच्यामार्फत बालकांना सेवा व उपचार करण्यात येतात.
गरजूंनी जिल्हा रूग्णालयात संपर्क साधावा…
बहुतांश मुले ही गरीब व कष्टकरी कुटूंबातील आहेत. या मुलांच्या पाल्यांकडे उपचारासाठी पैसे नसतात. त्यामुळे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या मुलांवर 10 हजार ते 8 लाख रूपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित असलेल्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्याचप्रमाणे असंख्य किरकोळ आजारी मुलांना जागेवरच औषधोपचार देऊन बरे करण्यात आलेले आहे. जागेवरच औषधोपचारास प्राधान्य दिल्याने यातून सदरच्या मुलांना आजारातून निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यात यश येते. त्यामुळे अंगणवाडी व शाळांतील बालक गंभीर आजाराने त्रस्त असल्यास त्यांच्या पालकांनी जिल्हा रूग्णाल, गुरूनानक चौक, सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात संपर्क साधावा.
– डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्य चिकीत्सक, सोलापूर.

हे ही वाचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या बोगस भरती प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे दाखल
आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
सोलापूरातील आरोग्य सेवांचे आणखी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार






