Farmer’s Suicide : सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असह्य झाल्याने शेतकऱ्यांनी कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेतला आहे, सदरची घटना चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, पळसखेड सपकाळ येथील शाम हरीदास कापसे (वय 35) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पळसखेड सपकाळ येथील शेतकरी शाम हरिदास कापसे हे 24 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते, परंतु ते घरी परत आले नाहीत, म्हणून त्यांचा शोध गावकऱ्यांनी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता घेतला असता, त्यांची बलखेड शिवारातील गट नंबर 8 मध्ये स्वतःच्या शेतातील निंबाच्या
झाडाला गळफास (Farmer’s Suicide) घेतल्याच्या अवस्थेत लटकलेले प्रेत दिसून आले. सदर घटनेची फिर्याद राधेश्याम देवराव काळे (वय ४०) रा. पळसखेड सपकाळ यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरून अमडापुर पोलिसांनी कलम 174 सी. आर. पी. सी. नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस करीत आहेत. सदर मृतक शेतकरी शाम कापसे यांचेकडे 4 एकर शेती असून भारतीय स्टेट बैंक, शाखा शेलसुरचे पीक कर्ज 1 लाख रुपये व बालाजी अर्बन पतसंस्था चिखली यांचे 4 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये थकीत कर्ज होते. इतरही कर्ज असल्याची माहिती हरिदास कापसे यांनी दिली. श्याम कापसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.