सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात सर्वसामान्य जनतेपासून ते शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी हे विविध सेवा-सुविधांसाठी येत असतात. परंतु या सर्वांकडून विविध कामांसाठी टक्केवारी घेऊन कामे केली जातात. यामध्ये या कार्यालयातील ओएस विष्णू पाटील, गणेश लोमटे आणि काकडे यांचा समावेश आहे. याबाबतचे सर्व पुरावे सोबत जोडत असून या सर्वांना निलंबीत करून त्यांच्या काळातील त्यांच्याकडे असलेल्या कामकाजाची सखोल चौकशी करून चौकशी अंती त्यांन बडतर्फ (Dismiss) करावे, अशी लेखी तक्रार शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव (2) एन. नवीन सोना यांच्याकडे केली आहे.
शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील ओएस विष्णू पाटील हे पैसे घेऊन कामे करतात. त्यांनी वर्ग 4 च्या अनुकंपा मधील उमेदवारांकडून पैसे घेऊन ऑर्डर दिल्या आहेत. टक्केवारी घेऊन मेडिकल बिले अधिकारी-कर्मचाऱ्यांना काढून देत असतात. तसेच ते ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे ढकलत नाहीत.
तसेच तक्रारीत असेही म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट मधील हॉस्पिटलचे नवीन परवाने आणि नूतनिकरणसाठी गणेश लोमटे यांच्या बरोबर संगणमत करून विष्णू पाटील हे एजन्ट ईसाक शेख मार्फत टक्केवारी घेऊन कामे करतात. एजंट र्इसाक शेख हा सर्व चलणाची फी, सर्व कागदपत्रे आणि टक्केवारीचे पैसे थेट जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात घेऊन येतो. आणि तोच सर्व फी भरून सर्व प्रमाणपत्रे करून घेऊन जातो. तसेच बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट मधील परवाने ईसाक शेख च्या हाती प्रक्रिया राबवून दिले जातात. ईसाक शेख हा संबंधीत प्रकरणातील पैशाचे व्यवहार चक्क जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातच पार पाडतो, हे विशेष आहे. त्यामुळे त्यांच्या काळातील जिल्हा शल्य चिकीत्सक काळातील सीसीटीव्ही फूटेज तपासावे. ईसाक शेख हा वारंवार येथे आल्याचे निदर्शनास येईल.
या कार्यालयात PCPNDT मध्ये काकडे हे ओएस विष्णू पाटील यांना हाताशी धरून टक्केवारी घेऊन कामकाज करत आहेत. PCPNDT मधील मान्यता आणि नुतनीकरणासाठी टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. ज्यांच्याकडून टक्केवारी दिली जात नाही, त्यांची प्रकरणे सर्वात आगोदर सादर होऊनही प्रलंबीत आहेत. तर ज्यांची टक्केवारी मिळाली आहे, त्यांची प्रकरणे उशिरा सादर होऊनही सर्वात आगोदर निकाली काढण्यात आली असल्याची वस्तूस्थिती आहे.
तरी या सर्व प्रकरणात विष्णू पाटील, काकडे, लोमटे आणि एजंट ईसाक शेख हे सर्वसामान्यांपासून ते शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची लूट करण्यात दंग आहेत. तरी विष्णू पाटील यांच्या कालावधीतील त्यांनी वर्ग 4 मधील अनुकंपाच्या दिलेल्या सर्व ऑर्डर, लोमटे यांच्या कालावधीतील बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमधील नविन आणि नुतनीकरण परवाने, काकडे यांच्या कालावधीतील PCPNDT चे नविन आणि नुतनीकरण परवाने आणि एजंट ईसाक शेख या सर्वांचे फोनवरील संभाषण, सोशल मिडीयाचे अकांऊट आणि GooglePay, PhonePay वरील आर्थिक व्यवहार आदी सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. याकडे प्रधान सचिव 2 एन. नवीन सोना यांनी संबंधीतांना निलंबीत करून त्यांची चौकशी करावी आणि चौकशीअंती या सर्वांना बडतर्फ करावे, अशी मागणी लेखी तक्रारीव्दारे शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव (2) एन. नवीन सोना यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा हे भारतीय क्रिकेटर्स आहेत शाकाहारी