सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
सहसंचालक, आरोग्य सेवा, (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) आरोग्य भवन, विश्रांतवाडी, पुणे या कार्यालयांमार्फत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदाची भरती 2022 ते 2024 या कालावधीत करण्यात आली आहे. सेवा प्रवेश नियमांतील मुददा क.३ (दोन) चे उल्लघंन केले आहे. यामध्ये सेवा प्रवेश नियमांना केराची टोपली दाखवून, नियमाबाहय व बेकायदेशीरपणे भरती केली आहे, तरी या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या बोगस व बेकायदशीरपणे केलेल्या भरती प्रक्रीये जबाबदार अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी लेखी तक्रार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आयुक्त तथा अभियान संचालक कादंबरी बलकवडे यांच्याकडे दाखल केली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या भरतीप्रक्रीयेत सेवा प्रवेश नियमांतील मुददा क.३ (दोन) चे उल्लघंन केले आहे. त्याअनुषंगाने शासन मान्यता विद्यापीठातून मुख्य विषय रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणिशाख/सूक्ष्मजीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/न्यायवैद्यकशास्र यासह विज्ञान शाखेची पदवी धारण करतील आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदविका डी.एम.एल.टी पदवी धारण केलेली असावी किंवा जे परावैद्यक तंत्राज्ञान प्रयोगशाळा तंत्रज्ञान अथवा विज्ञान शाखेतील परावैद्यक तंत्राज्ञान प्रयोगशाळा तंत्रज्ञान ही पदवी धारण करतील. त्यामुळे वरील शासनाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार हा विज्ञान शाखेतील पदवी धारण केल्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ शाखामध्ये पदव्युत्तर पदविका धारण करणे आवश्यक आहे. परंतु सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाच्या वरील अधिसूचनेला केराची टोपली दाखवून जे उमेदवार 12 वी उत्तीर्ण झाल्यावर डी.एम.एल.टी कोर्स केलेला आहे, अशा 102 उमेदवारांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर नेमणुकीचे आदेश दिले आहेत. तसेच 312 उमेदवार हे सेवा प्रवेश नियम शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर, २०२१ नुसार वैद्यकीय प्रयोगशाळा शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीका धारण नसलेले आहेत. तर सेवा प्रवेश नियमानुसार 211 उमेदवार हे सेवा प्रवेश नियम शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर, 2021 नुसार वैद्यकीय प्रयोगशाळा शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीका धारण केलेले आहेत. तर काही उमेदवारांनी सादर केलेली पदवी/पदवीका महाराष्ट्र परावैद्यक परिषदेच्या अधिनियम 2011 मधील कलम 2 नुसार मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ नाही अशा उमेदवारांना सुध्दा नेमणुकीचे आदेश देण्यांत आले आहेत. काही उमेदवारांनी सदरची चुक कार्यालयाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर काही उमेवारांच्या नेमणुका घाई घाईत कार्यालयाने रद्द केलेल्या आहेत.
हे ही वाचा सोलापूरातील आरोग्य सेवांचे आणखी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
पुढे तक्रारीत म्हटले आहे की, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदाचे सेवा प्रवेश नियमांबाबत आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालय, संचालक, आरोग्य सेवा संचालनालय व संबंधित अधिकारी यांची दिनांक 3 ऑगष्ट 2021 रोजी बैठक घेण्यात आली. त्यानंतर सुधारीत प्रयेगशाळा वैज्ञानिक अधिकारी सेवा प्रवेश नियमांच्या मसुदयास दिनांक 10 ऑगष्ट 2021 रोजी मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व मा. राज्यपाल महोदयांनी मान्यता दिलेली आहे. त्यानंतर प्रयेगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाचे सुधारीत सेवा प्रवेश नियम दिनांक 269/9/2021 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहेत.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदाचे सेवा प्रवेश नियम हे सुस्पष्ट असतांनी इंग्रजी भाषेमधील सेवा प्रवेश नियम जाहिरातीत टाकण्याचे कारण काय ? ही गोष्ट कार्यालयाच्या लक्षात असतानाही जाहिरात देण्यापुर्वी शासनाचे मार्गदर्शन/पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना कानाडोळा केलेला आहे. शासनाचे धोरण शासन कामकाज मराठी भाषेत होणे आवश्यक असताना इंग्रजी भाषेत जाहिरातीमध्ये सेवा प्रवेश नियम टाकण्याचे कारण समजून येत नाही. सेवा प्रवेश नियममनुसार पात्र नसलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावून शासन सेवेत सामावून घेणेसाठी प्रशासनाने पाठबळ दिले आहे. सहसंचालक कार्यालयास सेवा प्रवेश नियमामध्ये संभ्रम निर्माण आहे, हे माहित असतानाही प्रतिक्षा यादीवरील 11 उमेदवारांना कार्यालयांत बोलावून कागदपत्र पडताळणी केलेली आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा उमेदवारांध्ये आहे. यासाठी नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी. आरोग्य विभागात बोगस भरतीचे रॅकेट चालू आहे. आरोग्य विभागात बोगस भरतीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच सर्वसामान्य जनेतेलाही वाटत आहे की, बोगस भरती प्रक्रीयेला शासनच पाठबळ देत आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ बोगस भरती प्रक्रियमध्ये कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.
तरी या भरतीमध्ये जे अधिकारी-कर्मचारी सामील आहेत, त्यांची चौकशी करावी. तसेच त्यांचे मोबाईलचे सी. डी. आर. तपासावे. सर्व भरती प्रक्रियेचा बोगस प्रकार उघडकीस येईल. यातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कडक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, बोगस भरती प्रकियेत दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तातडीने गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि आयुक्त यांच्याकडे शरत शेट्टी यांनी केली आहे.
दप्तर गहाळ प्रकरणही गुन्हे दाखल करावे…
माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीमध्ये सी.सी.टी.व्ही फुटेज दिनांक 2/10/2024 रोजी सहसंचालक कार्यालयातील एक महिला कर्मचाऱ्याने खाजगी वाहन क्रमांक एम. एच. 14-6061 मधून शासकीय महत्वाचे दस्तऐवज व फाईलचे मोठे गठ्ठे कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे मार्फत गाडीत टाकून स्वतः संध्याकाळी 6 वाजून 20 मिनीटांनी घेऊन गेले आहेत. याचे व्हीडीओ रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. तरी कार्यालयातील अतिमहत्वाच्या फाईल खाजगी वाहनात व कार्यालय वेळ संपल्यानंतर घेवून जाणे याबाबत चौकशी करावी आणि दप्तर गहाळ प्रकरणी संबंधीतांवरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शरत शेट्टी यांनी केली आहे.
हे ही वाचा DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा





