सोलापूर : प्रतिनिधी
सीईओ मनिषा आव्हाळे यांनी जि. प. आरोग्य विभागातील औषध भांडारात औषध निर्माण अधिकारी पदी जयश्री किल्लेदार यांची ऑर्डर काढली. त्यानंतर दोनच दिवसात त्याच ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सतत वादग्रस्त ठरलेल्या प्रविण सोलंकी यांची औषध भांडार प्रमुख म्हणून ऑर्डर काढत सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे खुद्द “मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडील प्रदान केलेल्या अधिकाराचा” (आदेश क्र. जिपसो/साप्रवि-1/कार्या-2/1010/2010 दिनांक 18/09/2010) सीईओ मनिषा आव्हाळे (CEO Manisha Awhale) यांच्या आदेशा विरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी वापर केल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकींना औषध भांडार प्रमुख पदावरून हटवा
सीईओ मनिषा आव्हाळे यांनी शासन निर्णयातील निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, तिऱ्हे येथील औषध निर्माण अधिकारी जयश्री किल्लेदार यांची जिल्हा औषध भांडार येथे 31 जानेवारी 2024 रोजी विनंतीनुसार बदली केली. मात्र बदलीच्या दोन दिवसानंतर, 2 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सीईओ आव्हाळेंच्या आदेशाला डावलून औषध निर्माण अधिकारी प्रविण सोलंकी यांची ऑर्डर औषध भांडार प्रमुख म्हणून जारी केली. या ऑर्डरमध्ये म्हटले आहे की, औषध व लस भांडार येथील औषध वाटप/लस वाटप, औषध खरेदी इ. कामकाजाचा व्याप पाहता आणखीन एक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने व कार्यालयीन कामाच्या सोईच्या दृष्टीने प्रा. आ. केंद्र औराद येथील औषध निर्माण अधिकारी प्रविण बाबुलाल सोलंकी यांची सेवा औषध भांडार येथे औषध भांडार प्रमुख म्हणून उपलब्ध करून घेणेत येत आहे. तसेच जयश्री किल्लेदार यांनी लस विभाग प्रमुख म्हणून कामकाज करावे आणि सोलंकी यांनी आपला मुळे पदाचा पदभार सांभाळून औषध भांडार येथील कामकाज पहावे.
हे ही वाचा फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजेंवर गुन्हा दाखल
डॉ. नवलेंची वादग्रस्त सोलंकींना पसंती का ?
-यापूर्वी जि. प. आरोग्य सभापती व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदींनी प्रविण सोलंकी यांच्या वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यांच्यावर औषध जाळल्याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल होणे व त्याअनुषंगाने त्यांची चौकशी, आषाढी वारीतील औषध घोटाळा प्रकरणी 1 कोटीहून अधिक रकमेची वसुली, कंपन्याकडून दर्जेदार औषधांऐवजी एक्सपायरी जवळ आलेली औषधे खरेदी करणे, खरेदी झालेली संपूर्ण औषधांचे वाटप न करता स्टॉकबुकला खोट्या नोंदी घेणे, वारंवार त्याच त्या औषध पुरवठाधारकांना नियमांची मोडतोड करून ऑर्डर देणे, इतर औषध पुरवठाधरकांना टेंडर न भरण्यास सांगणे, मर्जीतील टेंडरधारक नसल्यास नियमात बसत नाही असे सांगत परस्पर टेंडरमधून नाव वगळणे आदी बाबत त्यांच्या तक्रारी आहेत. तसेच जिल्ह्यात 50 हून अधिक औषध निर्माध अधिकारी असताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंची वादग्रस्त अशा सोलंकी यांना पसंती का ? असा प्रश्न आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेत चर्चिला जात आहे.
किल्लेदार यांच्याकडूनही सीईओंच्या आदेशाला केराची टोपली
-सीईओ आव्हाळे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जयश्री किल्लेदार या रूजू झाल्या आहेत, मात्र त्यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या आदेशाचे पालन करत लस विभाग प्रमुख म्हणून कामकाज सुरू आहे. त्यामुळे सीईओ आव्हाळेंच्या आदेशाला आरोग्य विभागातील वरिष्ठच काय तर इतर कर्मचारीही मानत नसल्याचे दिसून येत आहे.
किल्लेदार यांच्या विनंती अर्जामुळे त्यांच्याकडे लस भांडार…
-संबंधीत प्रकाराबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले, सोलंकी यांच्या आलेल्या तक्रारीनुसार परत त्यांची नविन चौकशी सुरू करतो. तसेच किल्लेदार यांनी स्वतःच लस भांडारची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना लस भांडार दिले आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी किल्लेदार यांच्या विनंती अर्जाला मान देत आणि मार्च एंडच्या सोईसाठी सोलंकी यांची ऑर्डर काढून सीईओ आव्हाळे यांच्या आदेशाला मात्र केराची टोपली दाखवली आहे, अशी चर्चा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात सुरू आहे.
हे ही वाचा अर्हता नसताना महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातारकरांकडून प्रयत्न