सोलापूर : प्रतिनिधी
जि. प. आरोग्य विभागातील डॉ. अनिरूध्द पिंपळे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी त्यांच्या विरूध्द प्रधान सचिवांकडे केलेल्या तक्रारींमुळे, तर कधी कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने, तर कधी एकाच जिल्ह्यात 25 वर्षे कार्यरत असल्याने. सध्याही ते राज्याच्या आरोग्य विभागात चर्चेचा विषय ठरले असून यासाठी दारूची बॉटल, दारू पिल्याचा ग्लास आणि विमल गुटखा हे कारण आहे.
घडलेला प्रकार असा की, राष्ट्रीय शितसाखळी स्त्रोत केंद्र, पुणे येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी SHSRC मार्फत पीएचसी रिव्हीजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेदरम्यान जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना शासकीय रूम (क्रं. 901) देण्यात आली होती. डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना देण्यात आलेल्या या रूममध्ये चक्क दारूची बॉटल, दारू पिल्याचे ग्लास आणि विमल गुटखा आढळून आला आहे. या गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय शितसाखळी स्त्रोत केंद्र, पुणे यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठवून तक्रार नोंदवली आहे. शासनाच्या नियमांनुसार मद्यपान व धुम्रपान करण्यास सक्त मनाई असून तो गुन्हा आहे. परंतु वरिष्ठ कार्यालय येथे कार्यशाळा होते काय अन तेथे वरिष्ठ अधिकारी असतानाही असा लाजिरवाना प्रकार घडतो काय ? याबाबत राज्यातील आरोग्य विभागात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
याही पुढे जाऊन याची गंभीर दखल कुटूंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य चे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्यावर कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा, अशा लेखी सूचना सोलापूर जि. प. आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना दिल्या आहेत.
मद्यपानाबाबत डॉ. अनिरूध्द पिंपळेंना बजावली नोटीस
सदरच्या गैरप्रकाराबात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना वरिष्ठांकडून लेखी पत्र आले असून त्यांनी याअनुषंगाने डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. सदरच्या नोटीसला उत्तर आल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदरच्या अहवालानंतर डॉ. अनिरूध्द पिंपळेंवर काय कारवाई होणार ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा Dismiss | लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल डॉ. पिंपळेंना बडतर्फ करा
Transfer | 25 वर्षे एकाच जिल्ह्यात असलेल्या डॉ. पिंपळेंची जिल्हाबाह्य बदली करा
Health Department | आरोग्य मंत्र्यांचा आदेश झुगारून रफिक शेख मुख्यालयातच