सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस शहरामध्ये आठवडी बाजारात जादा कर आकारणे, कर गोळा करणाऱ्यांकडून उद्धट भाषेचा वापर, शहरात अनधिकृत बॅनर लावल्याने शेजारील दुकानाला नाहक त्रास सोसावा लागतो, यासंदर्भात कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही अनधिकृत बॅनर काढण्यास टाळाटाळ करणे, नगरपंचायत हद्दीत दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ, प्रत्येक पालखीला नगरपंचायतकडून अतिक्रम काढले जाते. मात्र यावेळेस अतिक्रमण काढले नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या माळशिरस शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यात याव्या, यासाठीचे लेखी निवेदन नगरसेविका रेश्मा सुर्यकांत टेळे यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
नगरसेविका रेश्मा सुर्यकांत टेळे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, माळशिरस शहरामध्ये आठवडी बाजारात नगरपंचायतकडून 3 पाट्या असेल तर 30 रुपये आणि मोठे मसालेवाले, भजेवाले, केळीवाले असेल तर यांच्याकडून शंभर-दीडशे रुपये घेतले जातात. आपल्याच शेजारी अकलूज नगरपरिषद आहे. तेथे 5 ते 6 पाट्या पालेभाज्या असल्या तरी फक्त 10 रुपये कर आकारला जातो. तर मोठ्या व्यापाऱ्यांकडून फक्त 20 रुपये घेतले जातात. त्यामुळे एवढा फरक आपल्याकडे का ? बाजार तळावर पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे, माळशिरस शहरांमध्ये दिवसा लाईट चालू असते. आपल्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा लाईट बंद केली जात नाही जात नाही. याचे ज्यादा बिल सर्वसामान्य जनतेकडून वसूल केले जाते.
हे ही वाचा उप सचिव अनिरूध्द जेवळीकरांच्या विरोधात 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू
माळशिरस नगरपंचायत कर विभागामध्ये घरपट्टीचा दुप्पट कर आकारला जातो. जर एखाद्याने पहिली पावती दाखवली तर त्याचा कर घेतला जात नाही. नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून किंवा तळ्यातून जे पाणी येते, ते फिल्टर केलेले नसते. त्याच्यामध्ये टीसीएल पावडर टाकली जात नाही. शहरातील हॉटेल सोडले तर कोणीही पाणी पीत नाही. पाणीपट्टी आपण 365 दिवसांची घेतो. शहराला 10-10 दिवस पाणी नसते. डीपी जळाला, तळ्यातील पाणी संपले म्हणून वॉटर सप्लाय पाणी बंद, लिकिज झाले पाणी बंद. 50 टक्के सुद्धा आपण त्यांना पाणी देऊ शकत नाही. माळशिरस शहरांमध्ये पाण्याचे लिकेज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. शहरात अनधिकृत नळ आपल्या कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. पाणी सोडणाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे नाहक जनतेला त्रास सोसावा लागत आहे. पालखीच्या दिवशी पाणी लिकेज झाल्यामुळे पेट्रोल पंप ते सावता माळी मंदिर परिसरात पाणीच पाणी रस्त्यावर होते, ते पाणी अजून बंद झालेले नाही.
हे ही वाचा दै. तरूण भारतच्या मुख्य संपादकपदी प्रशांत माने यांची पदोन्नती
माळशिरस शहरातील गटारी स्वच्छ नसल्यामुळे सर्व गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. गेली 2 वर्ष झाले शहरात फॉगिंग केले नाही. परिणामी मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. साफसफाई करणाऱ्या महिला व घंटागाडीचे योग्य नियोजन नाही. शहरात स्वच्छताचे नीट नियोजन नाही. नगरपंचायतिचे घरकुलचे राहिलेले हप्ते लवकर सोडण्यात यावेत. ज्या दिवशी तुम्ही नगरपंचायतीमध्ये असता त्या दिवशी नगरपंचायतीचे कर्मचारी पूर्ण दिवस असतात. ज्या दिवशी तुम्ही नसता त्या दिवशी नगरपंचायतीचे कर्मचारी स्वतःच्या मनाने ये जा करत असतात. नगरपंचायतीमधील सक्षन मशीन ड्रायव्हरच्या मनाने चालू असते. त्याचे योग्य नियोजन नाही.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये घोळ
शहरांमध्ये अनाधिकृत आरसीसी बांधकाम चालू आहेत. यावर आपल्या विभागाचे कसलेही लक्ष नाही. कित्येक बांधकाम गेली 4-5 वर्षे झाले पूर्ण केलेले आहे, तरी आपल्याकडे त्याची नोंद नाही. आपल्या नगरपंचायतमधून महिन्याला किती व कोणत्या विषयासाठी खर्च केला जातो ? याची माहिती सन्माननीय सदस्यांना मिळावी. आपल्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये जे स्वागत बॅनर लावले होते ते निघून पडले आहेत. यावर संबंधित विभागाला सांगून सुद्धा दुर्लक्ष केल जात आहे. आपल्या महिला व बालकल्याण व दिव्यांग विभागाला निधी टाकला जात नाही. पहिले पंचायत समिती होती. त्यावेळेस गोर-गरीब महिलांना शिलाई मशीन, भांडी सेट, मुलींना सायकल आदी साहित्य मिळत होते. या सर्व गोष्टींचा विचार केला तर पहिले ग्रामपंचायतच बरी असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. कर भरायचा नगरपंचायतचा व सुविधा ग्रामपंचायतीच्या सुद्धा मिळत नाहीत. या सर्व चुका कर्मचाऱ्यांमुळे होत आहेत. परंतु त्याचा त्रास आम्हा लोकप्रतिनिधीला सोसावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेत लोकप्रतिनिधी विषय निगेटिव्ह प्रतिमा तयार होत चालली आहे. तरी या सर्व विषयावर आपण योग्य निर्णय घेऊन माळशिरस मधील जनतेला न्याय द्यावा, अशी लेखी निवेदनाव्दारे मागणी नगरसेविका रेश्मा सुर्यकांत टेळे यांनी मुख्याधिकारी कल्याण हुलगे यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांची कोल्हापुरला नियुक्ती