सोलापूर : प्रतिनिधी
Unauthorized Parking : बेगम पेठ येथे अनेक इमारतीच्या पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू आहेत. यामध्ये रफिक मस्तुमसाब खरादी, रियाज महम्मद पटेल, अफसर शेख, कुरेशी, पिरजादे आदींचा समावेश आहे. तरी सदरील प्रकरणाकडे महापालिका प्रशासनाने (Solapur Municipal Corporation) लक्ष देऊन संबंधीतांवर बेकायदेशीर बांधकाम पाडून दंडात्मक कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी केली आहे.
लेखी तक्रारीत म्हटले आहे की, बेगम पेठ येथे बांधकाम परवाना नुसार बांधकाम केलेले नाही, परवानगी घेताना महापालिकेच्या नियमानुसार तळमजला पार्किंगसाठी सोडण्यात आला आहे. परंतु सध्या प्रत्यक्षात तेथे अनेक शॉप (गाळे) बांधून भाड्याने देण्यात आले आहेत. काही ठिकाणी दोन मजल्यांचा परवाना घेऊन प्रत्यक्षात पाच मजली बांधकाम केले आहे. अतिरिक्त FSI वापरून बांधकाम करण्यात आले आहे, महापालिकेच्या नियमानुसार सेट बॅक मार्जिन सोडलेली नाही, संबंधीत अनेक इमारतींचा वापर परवाना न घेता इमारत वापरात आणली आहे. अशा पध्दतीने गैरप्रकार करत पार्किंगच्या जागी शॉप/गाळे (Unauthorized Parking) सुरू असल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांना, तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना नाहक ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील रहिवासी जनतेलाही दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील बेकायदेशीर पार्किंगमधील शॉपवर कायदेशीर कारवाई करून पाडकाम करावे, शॉप/गाळे धारकांकडून 2001 पासून कमर्शिअल टॅक्स आणि दंड वसुल करावा, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी सांगितले.
हे ही वाचा Sugarcane | महाराष्ट्रातील ऊस पळवला जातोय कर्नाटकात
Solapur Municipal Corporation
मनपा प्रशासन कारवाई करणार का ?
– वास्तविक पाहता महापालिका प्रशासनाने आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनधिकृत गाळे, अतिक्रमण, बांधकाम, खोकेधारक यांच्यावर गेल्या 4 महिन्यांपासून धडक कारवाईस सुरवात केली आहे. शहरातील अतिक्रमण हटत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. परंतु दुसरीकडे बेगम पेठ येथील गैरप्रकाराबद्दल तक्रारदाराने गेल्या 6 महिन्यांपूर्वी लेखी तक्रार देऊनही अद्याप कारवाई केली जात नाही. दुसरीकडे येथील गैरप्रकार करणारे व्यावसायिकही “आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांभाळतो, त्यामुळे आमच्यावर कारवाई होणार नाही” अशा स्पष्ट शब्दात वाच्यता करतात. त्यामुळे या गैरप्रकाराला पाठबळ देणाऱ्या आणि महापालिकेची अशा प्रकारे बदनामी होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी केली आहे.
हे ही वाचा 31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
Google Pay युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ App