सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
डिजिटल युगातील ग्राहक हा ई-कॉमर्समधील फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ऑनलाइन सेवांमधील त्रुटींमुळे फसवणुकीला बळी पडत आहे. परंतु ग्राहकांच्या हितासाठी डिजीटल युगातील ग्राहकांच्या फसवणुकांवर ग्राहक आयोग हा प्रभावीपणे कारवाई करत आहे. ‘ई-जागृती पोर्टल’ आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (१९१५) मुळे तक्रार दाखल करणे सोपे झाले आहे, असे मत सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा भारती सोळवंडे यांनी व्यक्त केले.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात बुधवारी, सकाळी 11 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भारती सोळवंडे होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ॲड. विद्यावंत पांढरे, ॲड. भगवान भुसारी, ॲड. प्रणव कुलकर्णी, ॲड. वंदना जाधव, ॲड. गिराम, ॲड. साई गायकवाड, ॲड. श्रीधर राउळ, ॲड. श्रीकांत कोश आणि ॲड. अभिलाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अध्यक्षा सोळवंडे म्हणाल्यार 24 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 1986 साली 24 डिसेंबरला अनोखा असा ग्राहक संरक्षण कायदा भारतीय संसदेने ग्राहकांना दिला. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एकीकडे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदांची तरतूद तर दुसरीकडे याच तीन स्तरांवर ग्राहक न्यायालयांचीही स्थापना करण्यात आली. जेणेकरून ग्राहकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींचे सहज, सुलभपणे, कायद्याचं अवडंबर न करता कमीत कमी खर्चात, विना विलंब निवारण होईल. केवळ 30 कलमे असलेल्या या सोप्या, सुटसुटीत कायद्याचे आम्ही ‘ग्राहकांसाठी अल्लादिनचा दिवा’ म्हणून स्वागत केले. सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी ग्राहकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीमुळे ग्राहक आयोगात दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यातून जलद आणि सुलभ न्याय मिळवण्यावर भर दिला जात आहे.
यावेळी ॲड. जी. एच. कुलकर्णी (अधक्ष जि.ग्रा.तक्रार विधी संघ) यांनी ग्राहक हक्क आणि जागरूकता, ग्राहकांचे 6 प्रमुख हक्क (सुरक्षिततेचा, माहितीचा, निवड करण्याचा, म्हणणे मांडण्याचा, निवारणाचा आणि ग्राहक शिक्षणाचा) याची माहिती देणे, हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. सुनील सुरेश बनसोडे यांनी सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, फसवणूक झाल्यास घाबरून न जाता जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल करावी. तुमचा एक आवाज ग्राहक हक्कांचे संरक्षण करेल.
ॲड. प्रणव प्रमोद कुलकर्णी म्हणाले, “ग्राहकांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्यास ग्राहकांनी घाबरून न जाता आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देऊ,”
सदर कार्यक्रमात ग्राहकांनी आपले मनोगत मांडताना न्यायालयाकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत तावडे, दावल शिंदे, पंकज शिंदे, योगेश चवंडके यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. लक्ष्मिकांत गवई यांनी केले. स्वागत प्रशांत तावडे (प्रबंधक) यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ॲड. आश्लेशा क्षिरसागर यांनी मानले.
ॲड. भगवान भुसारी यांचा सन्मान…
एका महाविद्यालयाने गेल्या 5 वर्षांपासून एका विद्यार्थ्याची 10 वी, 12 वी आणि B. Sc ची मुळ कागदपत्रे स्वतःकडे ठेऊन घेतली होती. सदरच्या विद्यार्थ्याने संबंधीत महाविद्यालयाची साडेसात लाख रूपये फी देखील भरली. परंतु कोरोना काळात उर्वरीत किरकोळ फी ची रक्कम भरता आली नाही. त्यामुळे किरकोळ फी साठी महाविद्यालयाने विद्यार्थ्याची मुळ कागदपत्रे दिली नाहीत. सदरच्या विद्यार्थ्याला ॲड. भगवान भुसारी यांनी न्याय मिळवून दिला. सदरची केस लढून राष्ट्रीय ग्राहक दिनी त्या विद्यार्थ्याला त्याची सर्व कागदपत्रे अध्यक्षा भारती सोळवंडे यांच्या हस्ते सुपूर्द केली. यामुळे विद्यार्थ्याचे वकील म्हणून कामकाज पाहिलेले ॲड. भगवान भुसारी यांचाही यावेळी अध्यक्षा भारती सोळवंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हे ही वाचा जिल्हा रूग्णालयात 92 बालरूग्णांच्या मोफत गंभीर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न




