सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
अलिबाग, जि. रायगडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे आणि सोलापूरच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले. तसे लेखी आदेश महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी प्रे. ज्ञा. सोनटक्के यांनी नुकतेच जारी केले. डॉ. विखे आणि डॉ. बनसोडे यांच्या लेखी आणि तोंडी तक्रारी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंत गेल्या होत्या. परिणामी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीअंती कारवाईचे आदेश दिले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांना हेल्थ एटीएम मशीनमधील गैरव्यवहार, आरोग्य केंद्रांच्या बांधकामांमध्ये आर्थिक अनियमितता, औषध खरेदीत भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवर आर्थिक अत्याचार आणि इतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालावरून त्यांच्याविरूध्द निलंबनाचे आदेश देण्यात आले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे यांच्याही लेखी आणि तोंडी तक्रारीवरून चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या अहवालामध्ये डॉ. बनसोडे यांचे अत्यंत असमाधानकार प्रशासकीय व तांत्रिक कामकाज, क्षयरूग्णांच्या उपचारात अक्षम्य दुर्लक्ष, तसेच त्यांच्याविरूध्द अत्यंत गंभीर तक्रारी आल्या होत्या. यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे आणि तेथीलच वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद शामराव अभिवंत यांचा वाद जगजाहीर होता. पोलिस स्टेशन पासून ते सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठांपर्यंत लेखी तक्रारी ते आत्मदहनाचा इशारा असा प्रकार घडलेला. यामध्ये अनेक डॉक्टरांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर संघटनांनीदेखील प्रयत्न केले. पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने समोरासमोर बसवून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ. बनसोडे विरूध्द डॉ. अभिवंत वाद अखेर मिटला, या दोघांमुळे दोन गटात विभागले गेलेले जिल्हा क्षयरोग कार्यालय अखेर एक झाले, अशी चर्चा सुरू असतानाच डॉ. मिनाक्षी बनसोडे यांच्या निलंबनाचे आदेश पारित झाले.
मिशन डॉ. मिनाक्षी बनसोडे बडतर्फ…
जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांनी डॉ. मिनाक्षी बनसोडे यांच्या तक्रारी घेऊन अनेकवेळा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भेटी घेतल्या. मंत्री महोदयांनी चौकशी करा आणि सत्य असेल तरच कारवाई करा, असे आदेश आरोग्य भवन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे तक्रारकर्त्यांमधून मे 2025 पासुन ते ऑक्टोबर 2025 पर्यंत वारंवार डॉ. बनसोडे या निलंबीत झाल्याच्या अफवा पसरवल्या. परंतु नोव्हेंबरमध्ये सध्या निलंबनाचा आदेश सर्वांच्या हाती पडला. आता विरोधकांकडून निलंबनानंतर “मिशन डॉ. मिनाक्षी बनसोडे बडतर्फ…” अशी शपथ घेतली गेल्याची माहीती याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिली. तर दुसरीकडे जिल्हा क्षयरोग केंद्र पूर्वीपासुन व्यवस्थीत सुरू असताना यामध्ये येथील एका कर्मचाऱ्याने कार्यालयात भांडणे लावून देण्याचे काम केले. त्यामुळे यानंतर याही कर्मचाऱ्याचे निलंबन होणार असल्याची चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे.






