भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांने फेकली शाई, दाखवले काळे झेंडे, जोरदार घोषणाबाजी, अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रागृह येथे आगमन होताच चंद्रकात पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यापूर्वी त्यांच्यावर पुणे येथे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.
हे ही वाचा Health Minister Tanaji Sawant | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काँग्रेसकडून गाजराचा हार
गेल्या 15 दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रीमंडळात बदल करून अनेक जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यामध्ये सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ठिकाणी सोलापूरचे पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील यांच्या नावाखी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच आज रविवारी (15 ऑक्टोबर 2023) रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे सायंकाळी साडेआठच्या दरम्यान शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार होत असतानाच एका बाजूने भीम आर्मीचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर हा धावत आला. त्याने भारतीय जनता पार्टीचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी केली आणि पेन मधील काळी शाई पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकली. तसेच त्याने काळे झेंडे दाखवले. खाजगीकरण रद्द करा, अशी मागणी करताना बंदोबस्तमधील पोलिसांनी त्याला तात्काळ बाजूला ढकलत ताब्यात घेतले.
फोटो : शाईफेक नंतर चंद्रकांत पाटील यांनी घातले होते फेस शिल्ड
पोलिस आयुक्तांसमोर शाईफेक
सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी खुद्द पोलिस आयुक्त राजेंद्र माने हजर होते. त्यांच्यासमोरच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
यापूर्वीही पुण्यात शाईफेक
यापूर्वीही चंद्रकांत पाटील याच्यावर पुण्यात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. यावेळी बंदोबस्ता असलेल्या 10 ते 11 पोलिसांना निलंबीत केले होते. कालांतराने ते सर्व निलंबीत पोलिस रूजू झाले आहेत. मात्र यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याची घटना घडली होती.
यापूर्वी का झाली होती शाईफेक
चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना म्हणाले होते की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा निषधे म्हणून पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
भाजप आमदार देशमुख यांच्यावरही झाली होती शाईफेक
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यभर भाजपच्या विरोधात आंदोलने, निदर्शने झाली. त्यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक ही झाली. त्यानंतर सोलापूरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही एका कार्यक्रमाला जाताना भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक केली होती.