मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री अजित दादा की चंद्रकांत दादा ? यावर राज्यभर चर्चा झडल्या. हीच स्थिती अनेक जिल्ह्यात होती. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे गट, भाजप की राष्ट्रवादी वाल्यांना द्यावयाचे ? यावर एकमत होत नव्हते. एकाच जागेवर तीन्ही पक्षाचे उमेदवार इच्छुक होते. मात्र पुण्याचा पालकमंत्री अजित दादा की चंद्रकांत दादा ? यावर पडदा पडला असून पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर, पुणे नुंतर सोलापूर असा भटकंतीचा प्रवास करावा लागत आहे. मात्र अजित पवार हे चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट करून पुणे आपल्याच हातात ठेवण्यास यशस्वी झाले आहेत.
हे ही वाचा Today Horoscope 4 October 2023 | आजचे राशीभविष्य
राज्यातील 11 जिल्ह्यातील सुधारीत पालकमंत्र्यांची यादी जाहीर
आज, बुधवारी (ता.4 ऑक्टोबर) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती, अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील, भंडारा – विजयकुमार गावित, बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर – हसन मुश्रीफ, गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम, बीड – धनंजय मुंडे, परभणी – संजय बनसोडे, नंदूरबार – अनिल भा. पाटील आणि वर्धा – सुधीर मुनगंटीवार अशा पध्दतीने पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. मात्र त्यांच्याकडे आधीपासून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्यास पुरेसा वेळ देता येत नव्हता. 15 ऑगष्ट रोजी सोलापूरात झेंडावंदन देखील पालकमंत्री विखे-पाटील यांच्या ऐवजी हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी देखील सोलापूरच्या पालकमंत्र्यांची धुरा मुश्रीफ यांच्याकडे सोपविली जाणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या गेल्या. मात्र सध्या विखे-पाटील यांच्याकडील पालकमंत्री पद काढून चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
सध्या चंद्रकांत दादा पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र त्यांच्याकडे याबरोबरच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीच्या पालकमंत्र्यांसारखीच अवस्था होऊन वेळ देता येईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा Lingayat Community Reservation | आरक्षणासाठी लिंगायत समाजही आक्रमक