सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
आपल्याकडे प्रशिक्षीत मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात दवाखाने आहेत. या माध्यमातून उपचाराबरोबरच आजारांवर प्रतिबंध करणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक रूग्णांना विविध आरोग्य योजनांचा मोफत लाभ व दर्जेदार सेवा देऊया. लवकरच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवणार आहोत. रूग्णांना शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे राहणार नाही, अशी सेवा देऊया. या सर्वांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणाही लोक सहभागाची चळवळ व्हावी. लोकसहभाग असल्यास अशक्य गोष्टी शक्य होतील. आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडवूया. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे देखील केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पुणे उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे मंडळातील जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या सभागृहात नुकतेच ‘माझं गांव, आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आरोग्य मंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रधान सचिव-1 डॉ. निपुण विनायक, प्रधान सचिव-2 ई. रविंद्रन, संचालक डॉ. विजय केंदवाड, शहरी आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मारूती नवले, पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू

पुढे बोलताना आरोग्य मंत्री आबीटकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचा आणि त्याला आवश्यक निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासोबतच लोकसहभागाच्या माध्यमाचा आरोग्याचा जागर करण्यात येणार आहे. हे एक शासकीय अभियान न राहता यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग घेत व्यापक आरोग्य चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. गावपातळीपर्यंत आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यात आले. विभागामार्फत एकात्मिक आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांसारख्या राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचवून नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या देण्याचे काम करावे. योजना यशस्वी करण्याकरिता लोकसहभागाची चळवळ म्हणून पुढे आले पाहिजे.
याप्रसंगी श्री. जगदाळे म्हणाले, पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल पीएचसी’च्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामीण स्तरावर रुग्ण कल्याण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या समित्या पुन्हा कार्यान्वित कराव्यात.
डॉ. निपुण विनायक यांनी ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी माहिती देवून ते पुढे म्हणाले, आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नव्हे तर सार्वजनिक बाब आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयाला केंद्रबिंदू मानून विविध आरोग्य विषय योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहेत.
याप्रसंगी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान संदर्भात माहिती पुस्तिकेचे तसेच गीताचे अनावरण करण्यात आले. अभियानाच्या जनजागृतीकरिता चित्ररथाची फित कापून शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत पुणे विभागातील सर्व परिमंडळातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या उपस्थित होते. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
https://www.facebook.com/share/v/1E9gBCsnBf/
हे ही वाचा HIV AIDS नसतानाही निष्पाप महिलेला औषधे सुरू
डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर




