MLA Praniti Shinde | काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली टीम अखेर जाहीर केली आहे. त्यात बहुतांश जुनेच चेहरे आहेत. पण, नव्या रक्तालाही यात संधी दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून वर्किंग कमिटीवर मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, अविनाश पांडे (महासचिव) रजनीताई पाटील (प्रभारी), माणिकराव ठाकरे (प्रभारी), चंद्रकांत हंडोरे (कायम निमंत्रित), प्रणिती शिंदे (विशेष आमंत्रित) आणि यशोमती ठाकूर (विशेष आमंत्रित) यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांना वगळून अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या MLA Praniti Shinde या सध्या सोलापूर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांनी २००९ पासून आपल्या निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात केली. सोलापर मध्य या मतदारसंघातून त्या पहिल्यांदा २००९ मध्ये निवडून आल्या. त्यानंतर मोदी लाटेतही २०१४ मध्ये त्यांनी गड राखला आणि २०१९ मध्ये त्यांनी हॅटट्रीक केली. विशेषतः विरोधात वातावरण असूनही त्यांनी आतापर्यंत बाजी पलटवून दाखवली आहे.
MLA Praniti Shinde यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली संधी पाहता त्यांच्या लोकसभा उमेदवारीला पुष्टी देणारी ठरत आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत त्यांच्याच उमेदवारीचा आग्रह धरण्यात आलेला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे वय आणि त्यांची निवडणूक लढविण्यास ना पाहता प्रणिती या सोलापूरमधून लोकसभा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार ठरतात. कदाचित लोकसभेला पराभव झाला तर ‘सोलापूर मध्य’ हा हक्काचा विधानसभेचा मतदारसंघ त्यांच्यासाठी असणारच आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे यांची उमेदवारी काँग्रेससाठी दुहेरी फायद्याची ठरू शकते.
MLA Praniti Shinde यांची २००९ पासूनची विधान सभेतील कामगिरी पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली हेाती. भारत जोडो यात्रेत अमरावती विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ती प्रणिती यांनी चोखपणे पार पाडली होती. त्यादरम्यानच त्या राहुल गांधी यांच्या जवळ गेल्या होत्या. विशेषतः पक्षाची भूमिका त्या बेधडकपणे मांडतात. ‘कोण रोहित पवार’ हा सवालही त्याच श्रेणीतला. एकंदरीतच प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कमानीचा आलेख वाढत चाललेला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीतील निवडीने शिंदे यांचे पक्षातील वजनही पुन्हा अधोरेखित झाले आहे.