सोलापूर : प्रतिनिधी
Maratha Reservation Meeting : सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणारे, आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १७ दिवस अन्न आणि पाणी त्याग करणारे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे आणी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे यासाठी धडपडणारे मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची जाहीर सभा 5 ऑक्टोबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज संघटनेचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंतरवाली-सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला (Maratha Reservation Meeting) हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे-पाटील हे राज्यभर दौरे करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते येत आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ५८ मोर्चे काढले होते. पण सरकारकडून न टिकणारे आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी माऊली पवार यांनी केला.
त्यानंतर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्यावतीने लोकशाही मार्गाने मंत्री महोदयांकडे आणि शासन दरबारी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले आहेत. परंतु शासन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असे फक्त आश्वासन देत आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यापासून सरकार तर्फे कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही. महाआघाडीचे सरकार असताना, मराठा आरक्षण हे आघाडी सरकारने घालवले, असे सांगून राज्यभर भाजपा तर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आंदोलने करत होता. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तर जाहीरपणे सांगत होते की, आम्हाला सत्ता द्या मराठ्यांना आरक्षण देतो, मात्र त्याचाही सत्ताधारी मंडळींना विसर पडला आहे.
सध्या देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन वर्ष उलटून गेले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे फक्त आश्वासन देण्यापलिकडे कोणतीही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे सामान्य मराठा तरुणांचा सरकारवर विश्वास राहिला नाही. इतके दिवस शांततामय मार्गाने आंदोलन केले. परंतु आता मराठा तरुणांचा संयम सुटत चालला आहे, असेही माऊली पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जरांगे-पाटील यांनी लोकशाही मार्गाने आंतरावली सराटी येथे आंदोलन केले. परंतु सरकारने त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करायला सांगितला. गोळीबार केला, महिलांची डोकी फोडली, तरी सुध्दा आपल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपले उपोषण सुरूच ठेवले. सरकारला ३० दिवसाची मुदत दिली. परंतु सरकारवर दबाव रहावा, म्हणून आणि सरकारला मराठा समाजाची ताकद दिसावी, म्हणून आंतरवली येथे १०० एकर जागेमध्ये भव्य आरक्षण परिषद घेत आहेत. त्या परिषदेला लाखो मराठा समाज बांधवांनी हजर राहावे, म्हणून जरांगे पाटील महाराष्ट्रभर जाऊन प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना आरक्षण परिषदेला (Maratha Reservation Meeting) हजर राहण्याचे आवाहन करणार आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरासह, मंगळवेढा, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. त्यासाठी ते ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. तरी या सभांना हजारो मराठा बांधवांनी हजर राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस प्रा. गणेश देशमुख, प्रकाश ननवरे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, सूर्यकांत पाटील, सचिन टिकते, जी. के. देशमुख आदी उपस्थित होते.
Maratha Reservation Meeting
हे ही वाचा
Maratha Reservation News | मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात