सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने हे जिल्हा दौऱ्यावर जाताना स्वतःचा पदभार इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे देत नाहीत. परिणामी येथे विविध सेवा-सुविधांसाठी येणाऱ्या नागरिकांची-रूग्णांची वारंवार गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात डॉ. सुहास मानेंकडून नागरीक आणि रूग्णांची हेळसांड सुरू असून माढा, करमाळासह इतर तालुक्यातील रूग्ण आणि नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
हे ही वाचा उप सचिव जेवळीकरांच्या चुकीच्या आदेशामुळे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांची निघणार तिरडी यात्रा
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात वयाचे दाखले, सोनोग्राफी सेंटरसाठी परवाना व नुतनीकरण, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत नविन हॉस्पिटलना मान्यता देणे व नुतनीकरण, मेडिकल बिले, फिटनेस आणि अनफिट प्रमाणपत्रे देणे, काऊंटर सिग्नेच्यर आदी विविध सेवा-सुविधांसाठी रूग्ण आणि नागरिक जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात विविध तालुका व तालुक्यातील विविध गावांमधून येतात. परंतु येथे येणाऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे. कारण येथील जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने हे जिल्हा दौऱ्यावर जाताना स्वतःचा पदभार इतर कोणत्याही अधिकाऱ्यांकडे देत नाहीत. ते किती दिवस दौऱ्यावर जातात ? हे त्यांच्याशिवाय कोणालाही माहित नसते. परिणामी येथे येणारे रूग्ण आणि नागरिक यांना दिवसभर कार्यालयात बसून डॉ. सुहास माने यांची वाट बघून सायंकाळी परतावे लागते. त्यानंतर पुन्हा सदरचे रूग्ण आणि नागरिक दुसऱ्या दिवशी आल्यानंतरही तीच स्थिती येथे पहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना स्वतःची जबाबदारी, कर्तव्य याचे जराही भान नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे खुद्द आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
वादग्रस्त अधिकाऱ्याचा रूग्ण, नागरिकांना फटका
पूर्वीपासुनच डॉ. सुहास माने यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. ज्यामध्ये रायगड-अलिबागमधील पोलिस भरती दरम्यान झालेले खंडणी प्रकरण, डॉ. माने यांच्या आशिर्वादाने सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांचा मनमानी कारभार, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाकडे केलेली तक्रार, रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून स्वतःचे दालन सुशोभित करून घेणे आदी प्रकारे कामकाज केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. सध्याही सोलापूरमध्ये नव्याने उभारण्यात आलेले जिल्हा रूग्णालयही वारंवरा चर्चेचा विषय ठरत आहे. येथे बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्त्या करणे, पुन्हा उपसंचालकांच्या आदेशामुळे त्या रद्द करण्याची नामुष्की ओढावणे, अनेक प्रकरणे प्रलंबीत ठेवणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पूर्वीपासुनच वादग्रस्त असलेले डॉ. सुहास माने यांचा मात्र येथील रूग्ण आणि नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. तसेच ते इतर अधिकाऱ्यांकडे पदभार का देत नाहीत ? त्यांना सदरच्या कामामागील मलिदा इतर अधिकाऱ्यांना जाण्याची भिती वाटत आहे का ? अशी चर्चा खुद्द जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात रंगली आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना सहीचा अधिकार दिल्यास ते दुसऱ्या कोणत्याही पत्रावर सही करतात. काऊंटर सिग्नचर आणि फिटनेस सर्टिफिकेट अर्जंट नसते. त्यामुळे नंतरही त्यावर सही होऊ शकते. त्यामुळे अधिकार कोणाला दिला नाही, अशी माहिती डॉ. सुहास माने यांनी दिली. मात्र यामुळे त्याच-त्या रूग्णांना आणि नागरिकांना नाहक वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात