सोलापूर : प्रतिनिधी
औषध भांडारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गैरप्रकारे ठाण मांडून बसलेल्या प्रविण सोळंकी यांच्या गैरप्रकारे केलेल्या कामाकाजांबाबत आणि घोटाळ्यांबाबत “सत्ताकारण”ने वस्तुस्थिती उघड केली. परिणामी उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दखल घेत तत्काळ पत्र काढत सोळंकी यांना औषध भांडार येथून काढून त्यांना मुळ ठिकाणी पाठवण्याच्या लेखी सूचना दिल्या. परिणामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी तसे आदेश काढले असल्याने अखेर औषध भांडार मधून प्रविण सोळंकींची हकालपट्टी झाली आहे.
हे ही वाचा औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकींना औषध भांडार प्रमुख पदावरून हटवा
जि. प. आरोग्य विभागातील औषध भांडार येथे औषध भांडार प्रमुख पदावर प्रविण सोलंकी गैरप्रकारे कार्यरत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाला डावलून वादग्रस्त असलेल्या सोलंकी यांची गैरप्रकारे नेमणूक केली होती. तसेच सोळंकी हे गेल्या 10 वर्षात वारंवार औषध भांडारात कार्यरत असताना त्यांच्यावर अनेक घोटाळ्यांमध्ये सुरू असलेल्या चौकशा, एक्सपायरी जवळ आलेल्या मेडिसीनची खरेदी करणे, आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या सप्लायरला स्वतःहून कॉल करून टेंडर देणे आदी घडलेले प्रकार “सत्ताकारण”ने उघडकीस आणले. परिणामी या सर्व बातम्यांची दखल घेत उपसंचालकांनी सोळंकींची हकालपट्टी करण्याचे लेखी आदेश दिले.
हे ही वाचा सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाला केराची टोपली
लेखी आदेशात म्हटले आहे की, वारंवार वृत्तपत्रांमध्ये श्री. प्रविण सोळंकी, औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडील असलेला अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यमुक्त करणेबाबत बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. तसेच सोळंकी यांच्याकडून प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखान्यांसाठी औषधे साहित्य व साधन सामुग्री खरेदी करावयाचे सर्व प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या शिफारशीसह/मार्फत वरिष्ठ कार्यालयास तांत्रिक मंजुरी मिळणेकरिता सादर करणे अपेक्षित आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सर्व अपुर्ण खरेदी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या परस्पर या कार्यालयास सादर केले जातात. याबाबत या कार्यालयाकडून वारंवार लेखी व दुरध्वणीव्दारे औषध विभागाकडील प्रमुख पदावर असलेले श्री. प्रविण सोळंकी यांना सुचित करण्यात आले आहेत. तरीही सोळंकी यांच्याकडून विहित नमुन्यामध्ये व आवश्यक दस्तऐवजासह मूळ प्रतित प्रस्ताव सादर केले जात नाहीत. त्यामुळे प्रशासकिय कामकाज करत असताना नाहक अडथळे निर्माण होत असून लेखा विषयक त्रुटी आढळून येत आहेत. या कार्यालयाचा वेळ वाया जात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमार्फत गरीब गरजु रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्यामध्ये दिरंगाई होत आहे. नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी सोळंकी यांना औषध भांडार येथून काढून त्यांना मुळे ठिकाणी पाठवा, असे लेखी आदेश उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
CEO आणि DHO कडून कारवाईस टाळाटाळ
“सत्ताकारण”मध्ये प्रविण सोळंकी यांच्या नाहक उठाठेवीबाबत बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. भिमशक्ती सामाजिक संघटेनकडून 21 फेब्रुवारी 2024 रोजी सीईओ मनिषा आव्हाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना लेखी तक्रारी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल न घेतल्याने भिमशक्ती सामाजिक संघटनेकडून “प्रविण सोलंकी हटाव, औषध भांडार बचाव” असा फलक लावून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आंदोलन केले होते. तरीही सीईओ मनिषा आव्हाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सोळंकी यांच्यावर कारवाई केली नाही. सोळंकी यांच्यावर कारवाई करण्यास CEO आणि DHO यांनी टाळाटाळ केली. अखेर सदरचा विषय उपसंचालकांपर्यंत पोहचवल्यानंतर उपसंचालकांनी लेखी पत्र काढत त्यांच्या हकालपट्टीचे आदेश दिले. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सोळंकी यांना मुळे ठिकाणी जाण्याचे पत्र काढत कारवाई केली असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेत रंगली आहे.
सुनील लिंबोळे हटाव, औषध भांडार बचाव…
दरम्यान भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी म्हणाल्या की, सध्या सोळंकी यांना हटवल्याने प्रश्न सुटला नाही. तर येथे डॉ. शितलकुमार जाधव यांच्या कार्यकाळापासून आरोग्य सेवक असतानाही औषध भांडार मधील Log In Id आणि Password घेऊन सर्व कामकाज पाहणारे सुनील लिंबोळे यांची हकालपट्टी होणे गरजेचे आहे. ते GEM Porttal पासून ते इतर खरेदीच्या सर्व फाईलमध्ये लुडबुड करतात. हव्या त्या सप्लायरला टेंडर देण्यासाठी खटाटोप करतात. वरिष्ठांना अंधारात ठेऊन सप्लायरसाठी निमय-अटी बनवतात. त्यामुळे सुनिल लिंबोळे यांचे पद काय आणि त्यांचे कामकाज काय ? सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेही लिंबोळेंवर मेहरबान का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लिंबोळे यांचीही हकालपट्टी होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा प्रविण सोलंकी हटाव, औषध भांडार बचाव
काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा