सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यात 100 बेडचे जिल्हा आणि 100 बेडचे महिला रूग्णालय आहे. त्यांच्या अधिनस्त 16 ग्रामीण आणि 3 उपजिल्हा रूग्णालय तसेच जि. प. आरोग्य विभागाकडे 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 477 उप केंद्रे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात सक्षम अशी आरोग्य यंत्रणा आहे. याच माध्यमातून सोलापूरातील आरोग्य सेवा आणखी बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहीती पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान दिली.
हे ही वाचा उत्तम रूग्ण सेवा आणि रूग्णालयांच्या अत्याधुनिकरणासाठी प्रयत्नशिल राहणार
आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे चे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात माध्यमांच्या प्रतिनिधीशीं त्यांनी वार्तालाप साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपसंचालक डॉ. पवार म्हणाले, मी शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखलो जातो, त्यामुळे पुणे विभागातील आरोग्य संस्थाकडून चांगले कामच करून घेतले जाईल. आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू राहील.

पुढे बोलताना उपसंचालक डॉ. पवार म्हणाले, यापूर्वी मी महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा विविध ठिकाणचा कामाचा अनुभव आहे. पूर्वीचा अनुभव असल्याने सर्व आरोग्य संस्थांची माहिती आहे. याचा उपयोग आरोग्य सेवा आणखी उंचावण्यास मदत होईल. पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामच करून घेतले जाईल. नागरिकांच्या शासकीय रूग्णालयाकडून अपेक्षा आहेत, त्या पूर्ण केल्या जातात का ? सोलापूरचे कामकाज आणखी कासे उंचावले जाईल, आरोग्य सेवा आणि संस्थांचा अभ्यास करून दोन्ही गोष्टींचे बळकटीकरण करणे, अडीअडचणी समजून घेऊन मार्ग काढणे, शासनाच्या योजना व्यस्थीत राबविल्या जातात का ? आपल्या संस्था चांगल्या सुविधा देतात का ? यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्री “ॲक्शन मोड”वर; अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने कारवाईचे दिले आदेश
यावेळी त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा, जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालयांचा दौरा आणि तेथील आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांना रूग्णालयात उत्तम स्वच्छता दिसून आली. त्यांनी ओपीडी, वॉर्ड पाहिले. NCD कार्यक्रमाची माहिती घेतली. कर्मचाऱ्यांनी रिपोर्टींग आणि रेकॉर्डींग व्यवस्थित ठेवण्याच्या सुचना दिल्या. रूग्णांना चांगली सेवा देण्याचे आदेश दिले. ओपीडी वाढवण्याच्या सुचना दिल्या. तसेच येथे स्पेशालिस्ट सेवा लवकरच सुरू करून ऑपरेशन वाढवता येतील यावर मार्गदर्शक सुचना दिल्या. कॅथलॅबची सेवा येत्या महिना-दोन महिन्यात सुरू करण्याच्या ग्वाही दिली. स्वच्छता, आहार सेवेंचा आढावा घेतला.
उपसंचालकांकडून नवनियुक्त जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कामाची स्तुती
यावेळी उपसंचालक डॉ. पवार म्हणाले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी यापूर्वी दोन जिल्ह्यात अतीशय चांगले काम केले आहे. त्या सक्षम आहेत. त्या चांगल्या प्रकारे हॉस्पिटलचे कामकाज हाताळतील. आम्हीही सोबतीला आहोत. फक्त त्या या ठिकाणी नविन आहेत. बदलाची वाट पाहा. येथे उत्तमोत्तम सुविधा रूग्णांना उपलब्ध होतील, असे म्हणत उपसंचालकांकडून नवनियुक्त जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कामाची त्यांनी स्तुती केली.
उपसंचालक आणि जिल्हा शल्य चिकीत्सकांचा सत्कार
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शाखा सोलापूरच्या वतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण पुतळे, विभागीय अध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे, युवा अध्यक्ष विजयकुमार भांगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.






