जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर येथे चुकीच्या आदेशान्वये व सोयीस्कर पध्दतीने डॉ. एस. पी. कुलकर्णी ठाण मांडून बसले आहेत. तसेच अशाच पध्दतीने राज्यभरात संचालकांच्या अधिकाराचा उपसंचालकांडून सर्रास गैरवापर होत असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या, अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे अधिकार संचालकांना आहेत. वर्ग 1 आणि वर्ग 2 साठी स्वतंत्र संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार जिल्हा क्षयरोग केंद्र, सोलापूर येथे मुळ नेमणुक असलेले डॉ. एस. पी. कुलकर्णी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार संचालकांच्या आदेशान्वये स्विकारणे क्रमप्राप्त आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक यांच्याकडे विनंती अर्ज करून त्यानुसार प्रक्रीया पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र नियम-अटींना डावलून 2021 रोजी डॉ. एस. पी. कुलकर्णी यांनी त्यावेळचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्याकडे विनंती अर्ज जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर यांच्याकडून पाठवला. यावर तत्कालीन उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनीही स्वतःला अधिकार नसताना आणि संचालकांच्या अधिकारांचा स्वतः गैरवापर करून डॉ. एस. पी. कुलकर्णी यांच्याकडे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडून अशा पध्दतीने गैरप्रकारे केलेली नेमणुक रद्द करून काय कारवाई केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग 1 आणि 2 च्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवणे, प्रतिनियुक्त्या करणे आदी अधिकार संचालकांना आहेत. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांना असलेल्या अधिकारांचा गैरवापर जवळपास सर्वच विभागातील उपसंचालकांकडून केला जात असल्याचे चित्र आहे. अनेक जिल्ह्यात वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यांना उपसंचालकांकडूनच अतिरिक्त कार्यभार देणे, सोयीस्करपणे नियुक्त्या करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे याकडेही संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच राज्यभरातील वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यांना उपंसचालकांकडून देण्यात आलेल्या ऑर्डर तत्काळ रद्द करणे गरजेचे आहे.
डॉ. एस. पी. कुलकर्णींची जिल्हा बाह्य बदली करणे गरजेचे
जिल्हा क्षयरोग केंद्र, सोलापूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची अत्यंत गरज असताना डॉ. एस. पी. कुलकर्णी हे नेमणुक असूनही तेथे कार्यरत नाहीत. त्याऐवजी ते चुकीच्या आदेशान्वये जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात कार्यरत आहेत. तसेच डॉ. कुलकर्णी हे जवळपास 15 वर्षांहून अधिका काळ सोलापूर शहर-जिल्ह्यातच कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा क्षयरोग केंद्र येथे डॉ. कुलकर्णी यांची गरज नसेल आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते एकाच जिल्ह्यात कार्यरत असल्याने त्यांची जिल्हा बाह्य बदली करण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य विभागातून होत आहे.