पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात. वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून हीच पांडुरंगाची सेवा आहे. त्यामुळे सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा व आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात करण्यात आले होते. या बैठकीनंतर आयोजत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, अति. संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे डॉ. कैलास बाविस्कर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन वारकरी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने सर्व पालखी मार्गावरील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी. तसेच पालखी मार्गावरी संबधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता करुन तात्काळ औषध फवारणी करावी. तेथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. महिला वारकऱ्यांसाठी स्त्रीरोगतज्ञाच्या माध्यमातून विशेष तपासणीचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुढे आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, पालखी मार्गावरील पुरेसा औषधसाठा, तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता ठेवावी. पालखी सोहळ्यासोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक येतात. यासाठी आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, सुविधा आदीबाबतचा प्रचार-प्रसिध्दी करण्यात यावी. जेणेकरुन आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांची माहिती सर्व वारकऱ्यांपर्यत पोहोचविण्यास मदत होईल.
वारीदरम्यान खासगी दवाखान्यातील 10 टक्के खाटा आरक्षित
पंढरपूर शहर, त्याचबरोबर पालखी मार्गावरील खाजगी दवाखान्यात महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत असणाऱ्या रुग्णालयांना 10 टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत. ट्रॉमा आय. सी. यू. सेंटरच्या ठिकाणी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर वैदयकीय पथके, आवश्यक उपकरणे व औषधांसह सुसज्ज 331 रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. 46 ठिकाणी 10 खाटांचे तात्पुरते आय. सी. यू. कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. दिंडया सोबत पालखी मार्गावर 290 आरोग्यदुत बाईक अॅम्ब्युलन्सव्दारे आरोग्य सेवा देणार आहेत. त्याचबरोबर वारकरी भाविकांना औषधी किट आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिली.
यावेळी आमदार आवताडे म्हणाले, आतापर्यंत वारी कालावधीत आरोग्य विभागाने चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहारात आपला दवाखाना, ट्रामा केअर सेंटर , उपलब्ध आरोग्य सुविधा याबाबत ठळक फलक लावावेत. जेणे भाविकांना आरोग्य सुविधेचा लाभ घेता येईल. तसेच वारी संपल्यानंतर स्थानिक नागरिक आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेवून वारी नंतरही आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम म्हणाले, पावसाचे वातावरण लक्षात घेवून, पालखी मार्गावरील सर्वच ठिकाणच्या पाणी स्तोत्राचे नमुने तपासणी सुरु आहे. टँकर भरण्याच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन सदर ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याबतचे माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या तयारीबाबतचे सादरीकरण आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले. यामध्ये पालखी मार्गावर प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावरती 203 आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सर्व आरोग्य संस्थामध्ये पुरेशा औषधसाठा व तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता असणार आहेत असे सांगितले.
वाखरी पालखी तळाची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी
आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाखरी पालखी तळाची पाहणी करून प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी आवश्यक सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, सातारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा डॉ. युवराज किरपे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अधिकारी धनंजय वाळा आदी उपस्थित होते.






