सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत” भव्य मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 92 बालरूग्णांच्या मोफत गंभीर शस्त्रक्रीया यशस्वीपणे करण्यात आल्या. तसेच नवजात शिशु ते 18 वर्षे वयोगटातील बालरुग्णांच्या 92 गंभीर शस्त्रक्रीयांमध्ये मेजर 18 सर्जरी व मायनर 72 सर्जरी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी “सत्ताकारण”ला दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, सोलापूर आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई (बाल शल्यचिकित्सा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर नुकतेच जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक, सोलापूर येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. पारस कोठारी (प्रमुख, बाल शल्यचिकित्सा विभाग, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई). रोटरी जिल्हाचे प्रांतपाल रोटे. सुधीर लातूरे, प्रांतपाल रोटे. जयेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात टंगटाय, फिमोसिस, हर्निया, अवतरित न झालेला अंडकोष, नाभी हर्निया, सिस्ट/गाठी आदी व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची अंगणवाडी व शाळांमधून नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 92 बालरुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना या विशेष शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले होते.
या विशेष तज्ज्ञांची उपस्थिती : मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉ. पारस कोठारी आणि त्यांची तज्ज्ञ टीम या शिबिरासाठी विशेषतः सोलापूरमध्ये दाखल होती. तसेच त्यांच्याबरोबर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने या सर्व शस्त्रक्रिया पार पडल्या. यावेळी पी. पी. पटेल फाउंडेशन तर्फे सर्व रुग्णांच्या औषधोपचाराची संपूर्ण जबाबदारी स्विकारण्यात आली होती. शिबिरादरम्यान पालकांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, रोटरी जिल्हा वेल्फेर फंड मार्फत आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले. सदर शिबिरासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर व मेट्रन विजयमला बेले यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीर यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य केले आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरतीत 50 कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार ?





