सोलापूर : प्रतिनिधी
शिक्षक भरतीत खासगी संस्थेच्या मुलाखतीसह भरण्यात येणाऱ्या 4 हजार 879 जागा आहेत. त्यासाठी शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाचा आदेश तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा नियमावली सन 1981 च्या प्रचलित तरतुदीनुसार खाजगी शैक्षणिक संस्थेत एका जागेसाठी 3 ऐवजी आता एका जागेसाठी 10 या प्रमाणात अभियोग्यता धारक उमेदवारांना संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसारच सोलापूर जिल्ह्यातील 266 शिक्षकांची भरती होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता एका जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने नवीन आदेश काढून एका जागेसाठी 3 उमेदवार असा निर्णय घेतला होता. परंतु तो उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासकीय (रिक्त जागांपैकी 70 टक्के) व खासगी अनुदानित शाळांमध्ये (रिक्त जागांपैकी 80 टक्के) एकूण 21 हजार 678 शिक्षकांची पदभरती सुरू आहे. त्यातील 16 हजार 799 पदे शासकीय शाळांवरील असून त्या उमेदवारांना मुलाखतीविनाच नेमणूक मिळणार आहे.
गुणवत्ता यादीनुसार ज्यांची निवड झाली आहे. आता त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. त्यानंतर महिला, दिव्यांग शिक्षकांना प्राधान्याने सोयीच्या शाळा दिल्या जातील. उर्वरित शिक्षकांना रिक्त पदांनुसार समुपदेशनाद्वारे त्या-त्या शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. या शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला जवळपास 500 शिक्षक मिळणार असून 60 खासगी संस्थांमध्येही 266 शिक्षकांची भरती होणार आहे. तत्पूर्वी, खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरून निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील.
खासगी संस्थांमध्ये गुणवत्ता की डोनेशन ?






